कोल्हापूर : ‘उद्योजकांचा एकच नारा, दरवाढीला नाही थारा’, ‘उद्योगांत मंदी, महावितरणची चांदी’ अशा घोषणा देत उद्योजक, कामगारांनी शुक्रवारी ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा काढला. शिवाय याठिकाणी शंखध्वनी करीत वीज बिलांची होळी केली. दरवाढीविरोधात जिल्ह्यातील उद्योजकांनी उद्योग बंद ठेवून राज्य सरकार आणि ‘महावितरण’चा निषेध केला.महावितरणने गेल्या ५६ महिन्यांत १४ वेळा वीज दरवाढ लादली आहे. ही दरवाढ सुमारे २४ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे राज्यातील २ कोटी १५ लाख वीज ग्राहकांच्या बिलांत सरासरी दुपटीने वाढ झाली आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून दरमहा ७०६ कोटी रुपयांचे वाढीव अतिरिक्त अनुदान दिले होते. ते भाजप-युती सरकारने बंद केल्यामुळे वीजदरात २० ते २५ टक्के वाढ झाल्याने इतर राज्यांच्या तुलनेत हे वीजबिल दीडपट झाले आहे. त्याच्या निषेधार्थ आणि ही दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी उद्योजकांनी आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता उद्योजक, कामगार सासने मैदान येथे जमले. तेथून रेल्वे स्टेशन, गोकुळ हॉटेल, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे ताराबाई पार्कमधील ‘महावितरण’चे कार्यालय येथे मोर्चा आला. याठिकाणी ‘अन्यायी दरवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘महावितरण हाय-हाय’ अशा घोषणा आणि निषेधाचे फलक घेऊन त्यांनी प्रवेशद्वारावर शंखध्वनी करीत वीजबिलांची होळी केली. त्यानंतर ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी प्रवेशद्वारात येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. आंदोलनात शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, आयआयएफ, राईस मिल असोसिएशन, जिल्हा दळप-कांडप गिरणी महासंघ, आदींचे पदाधिकारी, सभासद, उद्योजक दिनेश बुधले, प्रकाश चरणे, बाबासाहेब कोंडेकर, रणजित शहा, प्रदीप व्हरांबळे, आदींसह उद्योजक, कामगार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात उद्योजकांचा ‘महावितरण’वर मोर्चा
By admin | Published: February 28, 2015 12:26 AM