कोल्हापूर : येथील प्रथितयश उद्योजक, मेनन ग्रुप आॅफ कंपनीज्चे अध्यक्ष राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरुप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी राधामणी, मुले सचिन आणि नितीन, पुतणे विजय, सतीश, मुलगी सविता गोपी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा दुपारी २.३० वाजता त्यांच्या लक्ष्मीनारायण नगर येथील ‘मेनन इन्क्लेव्ह’ या निवासस्थानापासून निघणार आहे गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ उद्योजक राम मेनन हे स्मृतिभ्रंशच्या विकाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्याभरापासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना दोन दिवसांपूर्वी शास्त्रीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी बुधवारी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला.
मेनन यांचे मूळ गाव केरळमधील श्रीनारायणपूरम. ते लहान असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांना आणि मोठे भाऊ चंद्रन मेनन यांना कोडुंगलूर येथील मामा करुणाकरन यांच्याकडे शालेय शिक्षण पूर्ण करावे लागले. तंत्रशिक्षण पदविका पूर्ण केल्यानंतर चंद्रन मेनन यांनी कोल्हापुरात उद्योगासाठी आले. शिवाजी उद्यमनगरमधील मेनन अॅन्सिलरिजमधील कामाची जबाबदारी राम मेनन सांभाळत होते. कोल्हापूरसह देशाच्या उद्योगविश्र्वात राम मेनन यांनी मेनन उद्योग समूहाची वेगळी ओळख निर्माण केली.
मेनन ग्रुपची उलाढाल सुमारे सातशे कोटी असून २५०० कामगार कार्यरत आहेत. या ग्रुपच्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के निर्यात ही जगभरातील २४ देशांमध्ये होते. उद्योगासह सामाजिक, क्रीडा, आदी क्षेत्रांत ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली. रुग्णालयातून त्यांचे पार्थिव लक्ष्मीनारायणनगरमधील ‘मेनन इन्क्लेव्ह’ या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.