परळी : ‘श्री राम जय राम जय जय राम’, ‘रामा रामा हो रामा’च्या जयघोषात श्रीरामनवमी जन्मोत्सव सज्जनगडावर उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामुळे संपूर्ण मंदिर परिसर राममय झाला होता. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यातही रामनवमी उत्साहात साजरी झाली. सातारा तालुक्यातील सज्जनगडावर गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सवास सुरुवात झाली. शनिवारी रामनवमी असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता काकड आरती, सात वाजता रामदास स्वामी समाधी महापूजा, दहा वाजता राम मंदिरास तेरा प्रदक्षिणा घालण्यात आल्या. दुपारी जन्मकाळ साजरा करण्यात आला. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच भाविकांसह महिलांनी गर्दी केली होती. मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते. मंदिराच्या समोरील मुख्य गाभाऱ्यात फुलांनी सजविलेला पाळणा बांधण्यात आला होता. या पाळण्यात श्रीरामाची मूर्ती वेदमूर्ती श्रीकृष्ण शास्त्री जोशी, व मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते पूजा करून ठेवण्यात आली. त्यानंतर १२ च्या सुमारास वेदमूर्ती श्रीकृष्ण शास्त्री जोशी यांचे जन्मकाळाचे कीर्तन झाले. श्री राम जन्मोत्सवानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. सातारा : शहरात रामनवमीनिमित्त राममंदिरांमध्ये भक्तगणांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. ‘श्रीराम जय राम जय जय राम...’ चा जयघोष सुरू होता. रामजन्माचा पाळणाही अनेक ठिकाणी सुरू होता. रामनवमीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. रामनवमीचे औचित्य साधून शहरात अनेक मंडळांच्या वतीने भजन, कीर्तन यांचे आयोजन केले होते. शहरातील गोराराम मंदिर, काळाराम मंदिर या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तींना पुष्पहार घातले होते. पादुका फुलांनी सजविल्या होत्या. मंदिरांमध्ये धूप, अगरबत्तींचा दरवळ होता. तर दीपही उजळले होते. ‘राम जन्मला गं सये...राम जन्मला...!’ अशा भक्तिगीतांनी वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. (प्रतिनिधी)