अमर पाटील :
कळंबा : कळंबा, पुईखडी, बालिंगा या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. येथे कर्मचारीवर्गाचा तुटवडा असल्याने कमी दाबाचा, अपुरा व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच पाणी तपासतात. दक्षिण विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या उपनगरातील विविध प्रभागातील नागरिकांची पाण्याची गरज या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रातून भागवली जाते. १९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा फिल्टर हाऊसची जलशुद्धीकरण क्षमता १० एमएलडी आहे. २००१ साली उभारण्यात आलेल्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी तर १९६२ साली उभारण्यात आलेल्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी आहे. मात्र, य तिन्ही जलशुद्दीकरण केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. गाळणी निरीक्षक एक, गाळणी परिचर एक, फिल्टर ऑपरेटर चार आणि लॅबअसिस्टंट एक अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे तंत्रशुद्ध पध्दतीने तंत्रज्ञाकडून केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण न होताच पाणी वितरित केले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नाशिक केंद्रातून आठ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या कर्मचारीवर्गाच्या तोकड्या अनुभवावर या जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सुरू आहे.
प्रत्येक जलशुद्धीकरण केंद्रात एका शिफ्टसाठी एक फिल्टर ऑपरेटर व दोन मजूर लागतात. दिवसाच्या चार शिफ्टसाठी चार फिल्टर ऑपरेटर, आठ मजूर लागतात. तंत्रज्ञांची वानवा असल्याने तुरटी ब्लिचिंगचा डोस मजूरच देतात.
ड्रेसिंग रूम, बॅकवॉशरूम, लॅबोरेटरी क्लोरीन रूम येथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अपुऱ्या प्रकाशात जलशुद्धीकरण सुरू असते. प्रचंड विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांबाहेर सुरक्षारक्षक तैनात नसल्याने कोणाचाही मुक्तसंचार केंद्रात सुरू असतो. विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अवैध धंदे जोरात सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित याप्रश्नी संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे.
कोट : या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांवर योग्य प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच जलशुद्धीकरण केंद्रे समस्यामुक्त होणार आहेत.
- नारायण भोसले, जलअभियंता
चौकट
कर्मचारीच तपासतात पाण्याची शुद्धता
पाण्याची चव, वास गढूळता १ एनटीयू, टीडीएस ५०० पीपीएम, एकूण कठिणता ३०० पीपीएम आणि पीएच ६.५० ते ८.५०असावा असा नियम आहे. परंतु या जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच तपासतात. त्यामुळे नागरिकांनी शुद्धजलाची अपेक्षा कुणाकडून करायची असा सवाल उपस्थित हाेत आहे.
फोटो : ०८ बालिंगा जलशुद्दीकरण केंद्र
१९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा जलशुद्धीकरण केंद्राची अपुऱ्या कर्मचारी वर्गाने दुरवस्था झाली आहे