कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील निवसास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. यानंतर आता रिपाइंचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवत, शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे, या शब्दांत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
कोल्हापुरात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब गंभीर आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत होते. आताच्या सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. हे सरकार आल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन करत असल्याचे आठवले यांनी नमूद केले.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. भाजपची याचा काही संबंध नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही. एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यास हरकत नाही, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. एसटी ही ग्रामीण भागात देणारी सेवा असून, एसटीला मदत करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे विलिनीकरण व्हावे, ही आमची भूमिका आहे, असे नमूद करत काही असले तरी शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे हे निषेधार्हच आहे. या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहे आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ही घटना परत व्हायला नको, याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार पुढे लक्ष देईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.