कोल्हापूर : इतरांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी कधीच मराठा समाजाने केलेली नाही. मात्र, काही संघटना, व्यक्ती या मराठा आणि इतर जातीच्या बांधवांमध्ये गैरसमज पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी हा प्रयत्न थांबवावा. मराठा आरक्षणाला विरोध करू नये, असे आवाहन कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने दिलीप पाटील, स्वप्निल पार्टे आणि सचिन तोडकर यांनी बुधवारी येथे केले.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोल्हापुराच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे यांच्याबाबतच्या केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. मंत्री कदम याविधानाबाबत माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने यावेळी देण्यात आला.
दिलीप पाटील म्हणाले, मराठा समाजाला दिलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा मुद्दा पुढे करून काही संघटना, व्यक्ती या आरक्षणाला विरोध करीत आहेत. मात्र, हे आरक्षण परिपूर्ण, कायदेशीर आहे. त्यातच आता केंद्र सरकारने सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असल्याने मराठा आरक्षणाला बळकटी येईल. त्यामुळे कोणीही आता मराठा आरक्षणाला विरोध करू नये.
स्वप्निल पार्टे म्हणाले, मंत्री रामदास कदम यांनी खासदार संभाजीराजे यांच्याबाबत राणे समितीने मराठा आरक्षणाबाबत काहीच सर्व्हे केला नसल्याचे जे विधान केले असल्याचा सकल मराठा समाज निषेध करत आहे.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांच्याबाबत मंत्री कदम यांनी केलेल्या विधानाबाबत माफी मागावी. अन्यथा मंत्री कदम यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही. कोल्हापुरातील त्यांच्या कार्यक्रमावेळी निदर्शने केली जातील. या पत्रकार परिषदेस राजीव लिंग्रस, आदी उपस्थित होते.