कोल्हापूर : राज्यात तेव्हा शिवसेना-भाजपची सत्ता होती, त्यामुळे शिवसेनेची जोरदार हवा होती. त्यात रमेश देव हे मूळचे कोल्हापूरचे. कसलेले अभिनेते. त्याची सांगड घालून शिवसेनेने त्यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तत्कालीन खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या विरोधात १९९६ ला उमेदवारी दिली परंतु देव यांना हा राजकीय गड सर करता आला नाही.देव यांना दुसऱ्या क्रमांकाची १ लाख ६४ हजार ४१४ मते मिळाली. शिवसेनेला कोल्हापूरने आमदार दिले परंतु खासदार दिला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघातून प्रत्येकवेळी नवीन उमेदवार देऊन यश मिळते का आजमावून पाहिले. त्यातूनच रमेश देव यांना उमेदवारी मिळाली होती.
तेव्हा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून गणपतराव सरनोबत रिंगणात होते. या दोघांच्या प्रचारासाठी बिंदू चौकात सभाही झाली होती. त्याकाळी लोकमाणसांवर चित्रपटसृष्टीचे गारूड होते. त्यामुळे मराठी अभिनेते निवडणुकीस उभे राहिल्याने हवा झाली होती.त्यात रमेश देव यांचे वक्तृत्वही चांगले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांनी लढत तरी चांगली दिली परंतु त्यांना ही जागा जिंकता आली नाही. त्यांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी सभांना मात्र जोरदार गर्दी व्हायची..