संतोष मिठारी - कोल्हापूर -दगड-धोंड्यांची वाट, पाणीटंचाई आणि अन्य पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या रामणवाडी (ता. राधानगरी) गोसंवर्धनाच्या माध्यमातून सक्षमीकरण व विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वेणुमाधुरी ट्रस्टच्या माध्यमातून गो-संवर्धन, गोमूत्र डेअरी सुरू करून स्वावलंबनाचा मंत्र जोपासला आहे.गो-संवर्धन आणि त्याद्वारे स्वावलंबी शेती, सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने २००२ मध्ये वेणुमाधुरी ट्रस्टने आपल्या कामाची रामणवाडीतून सुरुवात केली. दगड-धोंड्यांची वाट आणि पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या गावाची गरज ओळखून ट्रस्टने या गावाची निवड केली. तेरा वर्षांपूर्वी असलेल्या गावठी गायी परवडत नसल्याने लोकांनी त्या जंगलात सोडल्या होत्या. त्यामुळे गावात अवघ्या दहाच्या आसपास गायी होत्या. गायींचे पालन करावे यासाठी ट्रस्टतर्फे त्यांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला ग्रामस्थ दत्ता पाटील, मारुती पाटील, युवराज पाटील यांनी पुढाकार घेऊन बळ दिले. ट्रस्टतर्फे व्हेटर्नरी दवाखाना सुरू करण्यासह गोबरगॅस प्लॅँट बांधण्यात आले. परिणामी गायींची संख्या वाढली.त्यातून शेतीला मदत होण्यासह संबंधितांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून शेणापासून धूप बनविणे, गोमूत्राचा अर्क काढणे, शेणींपासून दंतमंजन निर्मिती ट्रस्ट सुरू केला. रामणवाडीसह जिल्ह्यातील लक्षतीर्थ वसाहत, घोसरवाड, उत्तरे, खोतवाडी व सोनतळीमधील महिलांना धूपनिर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे धूप बनविणे, गोवऱ्या लावणे, गोमूत्राची विक्री यांतून रोजगार मिळाला आहे. अनेकजण गायीचा निव्वळ दुधासाठी वापर करतात. गायीने दूध देणे बंद केल्यास काहीजण तिला कत्तलखान्याची वाट दाखवितात; पण, रामणवाडी गावकऱ्यांनी गो-संवर्धनाचे पाऊल टाकून स्वावलंबनाचा मंत्र खऱ्या अर्थाने जोपासला आहे.आठ रुपये लिटर गोमूत्रआयुर्वेदिक, औषधीदृष्ट्या गोमूत्राचे पूर्वीपासून महत्त्व आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन आणि ‘सोशल मीडिया’मुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे; शिवाय, गोमूत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे. त्यामुळे गोमूत्र, शेण, अर्काची मागणी वाढत आहे. रामणवाडीत सध्या ७० गायी आहेत. सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत ते संकलित केले जाते. रोज एक गाय साधारण गोमूत्राच्या माध्यमातून चाळीस रुपये मिळवून देते. गोवऱ्या सहा रुपये किलो दराने विकत घेतल्या जातात. ‘ग्रामीण विकास’ हा एक मोघम शब्द झाला आहे. शेतीकेंद्रित, गो-संवर्धन व स्वावलंबी शेती होणे हे खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. त्यादृष्टीने ‘वेणुमाधुरी ट्रस्ट’ने रामणवाडीतील या नव्या प्रयोगाची सुरुवात केली आहे. त्याचा सुपरिणाम दिसून आला आहे. गायीच्या शेणापासून बनविलेल्या धुपाची गेल्या दोन वर्षांत ७० हजार पाकिटांची विक्री झाली आहे. अर्काची मागणी वाढत आहे. गोमूत्राचा अर्क, दंतमंजन, धूप, आदींची बागल चौक (कोल्हापूर) मधील गोधन भांडारात विक्री केली जाते. टप्प्याटप्प्याने उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाईल.- राहुल देशपांडे, प्रकल्प समन्वयक, वेणुमाधुरी ट्रस्टआमच्या ३५० लोकसंख्येच्या रामणवाडीला स्वावलंबनाचा मंत्र ‘वेणुमाधुरी ट्रस्ट’ने दिला आहे. ट्रस्टने राबविलेल्या गो-संवर्धनाच्या प्रकल्पामुळे जंगलतोड कमी झाली असून रोजगारही उपलब्ध झाला आहे. ट्रस्टतर्फे गावाच्या सक्षमीकरणासह विकासासाठी पाणलोट योजना, विद्यार्थ्यांना समतोल आहार देणारी ‘अन्नामृत’, कुटीरोद्योग तसेच अन्य योजना राबविण्यात येत आहेत.- युवराज पाटीलग्रामस्थ, रामणवाडी
‘गोधन’ जपणारी रामणवाडी
By admin | Published: September 30, 2015 1:14 AM