आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : राज्यातील धनगर समाजाच्या प्रश्नासाठी येत्या पावसाळी आधिवेशनात विधानभवनाला घेरावा घालणार असल्याचा इशारा आमदार व राज्यातील धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राज्यात असणारा १४ टक्के धनगर समाज एकत्र आला तर सरकारची अडचण ठरु शकेल असेही ते म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षण मेळाव्यासाठी शनिवारी आमदार रुपनर हे कोल्हापूरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, धनगर समाजाचा एस.टी. आरक्षणाच्या प्रलंबीत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी समाजाला पोटजाती बाजूला ठेवून विवीध संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. सत्तेवर कोणतेही सरकार असो ते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच बगल देत आले आहे. यासाठी समाजाने एकजूठ होऊन सरकारवर दबाव वाढविला पाहीजे. या आंदोलनाची ठिणगी निखाऱ्यामध्ये होण्यासाठी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात मेळावे घेण्याचे काम सुरु आहे.
आतापर्यत १५ जिल्ह्यात मेळावे घेण्यात आले असून आंदोलनासाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या लोकसहभागाच्या बळावर आंदोलनाने उग्र रुप धारण करु. आम्ही नवीन आरक्षण मागत नाही, घटनेत मंजूर झालेलेच आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वी दुग्ध विकासराज्यमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याकने ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.