कºहाड : वयाची साठी ओलांडली की अनेकांच्या हातात काठी येते. शरीराला व्याधी जडतात. त्यामुळे काहींना नीटसं चालताही येत नाही; पण साठी ओलांडलेले तब्बल दोनशेहून जास्त ज्येष्ठ नागरिक कºहाडात रविवारी मॅरेथॉनमध्ये धावले. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. उतार वयातही आरोग्यदायी राहण्याचा मंत्र या ज्येष्ठांनी मॅरेथॉनमधून दिला.येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय आणि प्रीतिसंगम हास्य परिवाराच्या वतीने रविवारी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिक्षणमहर्षी ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. कमलाकर गुरसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांचा मॅरेथॉनमधील सहभाग हा उत्साहवर्धक आहेच. शिवाय तरुणांनाही लाजवेल असा आहे. या स्पर्धेद्वारे स्वत:बरोबरच तरुणांनाही प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही. हास्ययोग हा बिना फीचा व बिना खर्चाचा व्यायाम आहे. यातील विचार सकारात्मक असल्याने हास्ययोग करणारे स्वर्गात जात नाहीत तर स्वर्गच त्यांच्याकडे येतो. महाविद्यालयाच्या अशा स्तुत्य उपक्रमास हास्य परिवाराचे नेहमीच सहकार्य राहील.’प्रारंभी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ज्येष्ठांच्या मागणीनुसार ही मॅरेथॉन प्रत्येक वर्षी घेण्याचे आश्वासन प्राचार्य पाटील यांनी यावेळी दिले. या स्पर्धेत पुरुष गटात १६६ व महिला गटात ३४ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. पुरुष गटात शामराव गुजर यांनी प्रथम, बाळासाहेब भोगम यांनी द्वितीय, दीपक टकले यांनी तृतीय तर उत्तेजनार्थ क्रमांक गजानन कुलकर्णी यांनी मिळवला. महिला गटात कमल खापे यांनी प्रथम, संजीवनी कुलकर्णी यांनी द्वितीय, सरिता हर्षे यांनी तृतीय तर रोहिणी इनामदार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेश रजपूत व प्रा. पी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संतोष कोपर्डे यांनी आभार मानले. कार्यक्रमास यशवंत डांगे, डॉ. हेमंतराव जानुगडे, नितीन पंडित, ताराचंद खंडेलवाल, पांडुरंग यादव, शिवाजीराव जगताप, उपप्राचार्य डॉ. जे. ए. म्हेत्रे आदी उपस्थित होते.‘बायपास’ झालीय; पण उत्साह कायम !स्पर्धेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांमधील अनेकजण ८० वर्षांपुढील, बायपास सर्जरी झालेले, हृदयाच्या व गुडघ्याच्या शस्त्रक्रिया झालेले, तसेच मधुमेही होते. सर्वांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. बक्षीस समारंभानंतर प्रीतिसंगम बागेत एखाद्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासारखे वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हातात घेऊन फोटो काढत होते.
‘साठी’ ओलांडलेले ज्येष्ठ मॅरेथॉनमध्ये धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:20 PM