फसव्या सरकारविरोधात तालुक्यात रान पेटवा : प्रकाश आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:46 PM2019-02-06T17:46:09+5:302019-02-06T17:52:03+5:30
गोरगरिबांच्या तोंडचे धान्य काढून घेणाऱ्या केंद्र व राज्यातील फसव्या सरकारविरोधात तालुक्या तालुक्यात रान पेटवा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केले. बचावात्मक राहण्याचा काळ संपला असून, कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सरकारला उघडे पाडा, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : गोरगरिबांच्या तोंडचे धान्य काढून घेणाऱ्या केंद्र व राज्यातील फसव्या सरकारविरोधात तालुक्या तालुक्यात रान पेटवा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केले. बचावात्मक राहण्याचा काळ संपला असून, कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सरकारला उघडे पाडा, असेही त्यांनी सांगितले.
बूथ कमिट्या व शक्ती अॅपची आढावा बैठक बुधवारी कॉँगेस कमिटीत झाली, त्यामध्ये ते बोलत होते. कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल यांच्या अनुपस्थितीत प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पी यांनी आढावा घेतला. आवाडे म्हणाले, संजय गांधी निराधार पेन्शन, धान्य, रॉकेल, गॅस नागरिकांना मिळत नाही, घरकुलसाठी जाचक अटी घातल्या आहेत. या सर्वांमुळे जनतेत कमालीचा रोष आहे.
सामान्य माणूस हवालदिल झाला असून, त्याला आधार देण्याचे काम कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. आता मरगळ झटकून कामाला लागा, दर १५ दिवसाला तालुका कार्यकारिणीचा आढावा घेणार आहे. महिन्याला सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाची माहिती घेतली जाईल. यशवंत हप्पी म्हणाले, सरकारच्या धोरणावर सामान्य माणूस कमालीचा नाराज आहे, तो कॉँग्रेससोबत पुन्हा सक्रीय होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी त्याला विश्वास दिला पाहिजे.
अॅड. सुरेश कुराडे, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, शहराध्यक्ष संध्या घोटणे, आदी उपस्थित होते. बैठकीनंतर हप्पी यांनी तालुकाध्यक्षांशी स्वतंत्र चर्चा केली.
मग तो नेता खोटे बोलतोय
आमच्यातील भांडणाला पूर्णविराम दिला आहे. तरीही कोणी वाद असल्याचे सांगत असेल तर तो नेता खोटे बोलतोय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आवाडे यांनी केले.
काम करा अन्यथा बदल निश्चित
तालुकाध्यक्ष ४0 वर्षे आहात, हे चांगले असले, तरी नवीन पिढीला सोबत घेऊन काम करा, असा सल्ला आवाडे यांनी गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील यांना दिला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कॉँग्रेसचे विचार वेगाने पुढे घेऊन जा. तुम्ही आहे तिथेच थांबणार असाल तर आम्हाला वेगाने पुढे जाणारा तालुकाध्यक्ष निवडावा लागेल. असा इशाराही त्यांनी दिला.
कॉँग्रेस कमिटीत वॉररूम
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर ताकदीने केला जाणार आहे. यासाठी कॉँग्रेस कमिटीत वॉररूम केली असून, येत्या आठ दिवसांत ती कार्यान्वित होईल, असेही आवाडे यांनी सांगितले.