कोल्हापूर : केवळ चित्रकारच म्हणून नव्हे तर व्यापक दृष्टिकोन ठेवून दिशादर्शक काम करणारे दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांची रंगबहार चळवळ युवा चित्रकार पुढे नेतील, असा निर्धार करून कोल्हापुरातील कलाक्षेत्राने श्यामकांत जाधव यांना कार्यात्मक श्रद्धांजली वाहिली.कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार श्यामकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. या निमित्ताने कोल्हापूरच्याकलाक्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन शुक्रवारी शाहू स्मारक भवनमध्ये शोकसभा घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत श्रीकांत डिग्रजकर, चंद्रकांत जोशी, अजेय दळवी, जाधव यांच्या कन्या स्नेहलता घाटगे, मेहुणी सुनीता पाटील, मुलगा इंद्रजित व धनंजय जाधव, विजय टिपुगडे, मनोज दरेकर यांच्यासह कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळींनी भावनांना मोकळी वाट करून दिली.जाधव हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे क्षेत्र जरी चित्रकारिता असले तरी त्यांनी कायमच व्यापक दृष्टिकोन ठेवला. एक सजग माणूस म्हणूनच ते जगले. अपेक्षाविरहित जगताना नेमके कुठे थांबावे हे जाधव यांना लवकर कळले. त्यांनी स्वत: चित्रकार म्हणून घडतानाच अनेकांना या विश्वात येण्यासाठी पाठबळ दिले. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली हे मान्य; पण ती भरून काढण्यासाठी त्यांनीच रंगबहार चळवळीच्या माध्यमातून तयार करून ठेवलेला मार्ग पुढे निरंतर सुरू ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे, असे भावोद्गार यावेळी सर्वच कलावंतांनी काढले.जाधव यांच्या कन्या स्नेहलता घाटगे व मेहुणी सुनीता पाटील, मुलगा इंद्रजित व धनंजय जाधव यांनीही जड अंत:करणाने भावना मांडताना, मजेत जगणारे आपले वडील मृत्यूलाही मजेतच सामोरे गेले. त्यांचे माणसे जोडण्याचे आणि उच्च विचारसरणीने जीवन जगण्याचे संस्कार आम्हा सर्वच मुलांवर पडले. त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमच आदर्शवत राहिले. त्यांच्या आठवणी पुढेही जपण्यासाठी साथ द्या, असे आवाहन केले.मनोज दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत डिग्रजकर यांनी आभार मानले. यावेळी मंगेश शिंदे, रियाज शेख, पी. के. दीक्षित, रमेश पोवार, सागर गायकवाड, संजय शेलार, अमृत पाटील, रमेश बिडकर, गजेंद्र वाघमारे, अशोक धर्माधिकारी, राहुल रेपे, चेतन चौगुले, अशोक सुतार, किशोर पुरेकर, सुरेश मिरजकर यांनीही भावना व्यक्त केल्या.