कोल्हापूर : लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता कोल्हापूरकरांना शक्तीच्या आराधनेचा उत्सव असलेल्या नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. यानिमित्त साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांना रंगरंगोटी करण्यात येत आहे; तर कुंभारवाड्यात अंबाबाईसह स्त्रीदेवतांची विविध रूपे घडविली जात आहेत. मंदिराच्या स्वच्छता कामाला शनिवारपासून (दि. ३) सुरुवात होणार आहे.अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो. हा पंधरवडा संपला की दुसऱ्याच दिवशी नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. यंदा अधिक महिना आल्याने प्रत्येक सण पंधरा दिवसांनी पुढे गेला आहे. त्यानुसार १३ आॅक्टोबरला घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. १७ तारखेला ललितापंचमी व २२ तारखेला विजयादशमी आहे. उत्सवाला तेरा दिवस शिल्लक राहिल्याने मंदिराच्या पाचही शिखरांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनिल अधिक यांच्या वतीने दरवर्षी ही सेवा मोफत पुरविली जाते. उत्सवाआधी चार दिवस मंदिराला विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मांडव उभारण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त गेल्या आठ वर्षांपासून मुंबईतील संजय मेंटेनन्सच्यावतीने अंबाबाई मंदिराची स्वच्छता करून दिली जाते. कंपनीचे मालक एक दिवस गाभारा स्वच्छ करण्यासाठी येतात. यंदा मेंटेनन्सचे कर्मचारी यंत्रसामग्रीसह उद्या, शुक्रवारी कोल्हापुरात दाखल होतील. शनिवारी (दि. ३) सकाळपासून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल. हे काम आठ दिवस चालेल. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात अंबाबाई मंदिराला रंगरंगोटी
By admin | Published: October 01, 2015 12:19 AM