लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली असताना गतवेळचे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यांच्यात आतापासूनच सोशल मीडियावर राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तुळशी, धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली आरोग्य केंद्राकडील रुग्णवाहिकेच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये चांगलेच वॉर जुंपले आहे. अगदी ‘झोपा’ काढण्याच्या शब्दावरून एकमेकावरती जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका दिल्या. त्यापैकीच राधानगरी तालुक्याच्या पश्चिम व अतिदुर्गम भागातील म्हासुर्ली या केंद्रास एक रुग्णवाहिका देण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात ही रुग्णवाहिका सरवडे केंद्राला बहाल करण्यात आल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी जि.प.चे अध्यक्ष बजरंग पाटील यांना तशा आशयाचे निवेदन देऊन म्हासुर्ली खोऱ्यावरती अन्याय केल्याचे त्यांच्या समोर गाऱ्हाणे मांडले.
म्हासुर्ली हा दुर्गम भाग राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विनय पाटील व काँग्रेसचे सागर धुंदरे यांच्यात अटीतटीची लढत होऊन त्यात राष्ट्रवादीचे विनय पाटील काठावरच्या मताधिक्याने विजयी झाले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली असताना हे दोन्ही उमेदवार आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
म्हासुर्ली येथील उपकेंद्रास मिळालेली रुग्णवाहिका सरवडे उपकेंद्राला दिली गेल्याच्या निषेधार्थ सागर धुंदरे यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील यांच्या कामावरती आक्षेप नोंदवीत सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य ‘झोपा’ काढत होते का? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील यांनी लागलेच ‘विनय पाटील झोपा काढत नव्हते, तर तुमच्या झोपा उडालेल्या दिसतात’ असे प्रत्युत्तर दिल्याने सोशल मीडियावरती एकच खळबळ उडाली. या दोघांच्या प्रतिक्रियांमुळे कार्यकर्त्यांमध्येही जोरदार शाब्दिक खेळ रंगला आहे, याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.