कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या वाक्युद्ध रंगले आहे. महाडिक यांनी मदतच केली नाही, असा आरोप पोवार यांचा आहे. मी प्रामाणिकपणे मदत केली आहे, पण जर कोणाला वाटत असले की, मदतच केली नाही, तर याचे उत्तर पक्षश्रेष्ठींनाच देईन, असे प्रत्युत्तर त्यांना खासदार महाडिक यांनी दिले.स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आठ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरविले होते. त्यात ‘कोल्हापूर उत्तर’मधून शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना पक्षाने संधी दिली. लोकसभेत जिल्ह्यातील जागा जिंकल्यानंतर राष्ट्रवादीला बळ आले होते. त्या बळाच्या जोरावर विधानसभेतही बाजी मारू, अशी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहून पक्षाचे शहराध्यक्ष पोवार आणि जिल्ह्यातील एकमेव खासदार महाडिक यांच्या वाक्युद्ध रंगले आहे.लोकसभेवेळी धनंजय महाडिक यांच्यासाठी आम्ही पायाला पाने बांधून फिरलो आणि त्यांना विजयी केले. त्यानंतर जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी खासदार महाडिक यांनी काम करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी विधानसभेवेळी मला मदत केली नाही, तर उलट आपल्या ‘नात्या-गोत्या’ला प्रोजेक्ट केले, असा आरोप पोवार यांनी केला. पोवार म्हणाले, मदतीसाठी खासदार महाडिक यांच्या दारात गेलो. त्यावेळी त्यांनी आपण धर्मसंकटात सापडल्याचे सांगितले. एक सभा, एक मेळावा आणि प्रचार प्रारंभवगळता त्यांची कोणत्याही स्वरूपातील मदत मला झालेली नाही. त्यांना पक्षाच्या उमेदवाराकडे दुर्लक्षच करायचे होते, तर निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या नातेवाईकालाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करायचा होता. त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करून विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबाबतचा अहवाल सादर करणार आहे. मी मदत केलीच आहे, पण त्यांना वाटत नसेल, तर त्याला काय करायचे. स्वबळावर सर्वच पक्ष लढत असल्याने विधानसभेची निवडणूक ‘टफ’ बनली. पक्षातील दिग्गज नेते आपआपल्या मतदारसंघांत अडकून पडले. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार करण्याची माझ्यावर जबाबदारी होती. पक्षश्रेष्ठींकडून मला सर्वच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही परिस्थिती जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यादृष्टीने प्रयत्न करा, असा आदेश होता. त्यानुसार माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींनाच उत्तर देईन, असे सांगत पोवार यांच्या आरोपांचे खासदार महाडिक यांनी खंडन केले. ते म्हणाले, आर. के. पोवार यांचा प्रचार प्रारंभ, सभा आणि मेळाव्याला मी उपस्थित होतो. शिवाय पक्षाच्या नगरसेवकांना पोवार यांच्यामागे ठाम उभे राहून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. माजी मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, दत्तात्रय घाडगे, मदन कारंडे यांच्यासह अन्य मतदारसंघांतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन-तीन, चार-चार सभा घेतल्या. माझ्या परीने पक्षाच्या उमेदवारांसाठी काम केले आहे.(प्रतिनिधी)
‘राष्ट्रवादी’मध्ये रंगले वाक्युद्ध
By admin | Published: October 24, 2014 12:02 AM