कोल्हापूर : डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती.आई अंबाबाईचा हा पालखी सोहळा अष्टमीला रात्री अंबाबाईने महिषासुराचा वध केला, त्याप्रीत्यर्थ आयोजित केला जातो. त्यामुळे या दिवशी फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा असते. रात्री ९.३० वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीचे वाहन महाद्वारातून बाहेर पडले. तत्पूर्वी उद्योजक राजू जाधव व त्यांच्या परिवाराच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, एन. डी. जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.आई अंबाबाईच्या स्वागतासाठी प्रदक्षिणा मार्गावर भक्तांनी आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. सोबतीला पोलीस दलाच्या बँडने आईला विविध धून वाजवीत मानवंदना दिली. आगमनाच्या मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. महाद्वारातून गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे पालखी भवानी मंडपात आली. या ठिकाणी आई अंबाबाई व तुळजाभवानीची भेट झाली. येथे छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली. तेथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. बिनखांबी गणेश मंदिरामार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारात आले आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधण्यात आली.प्रसादाचे वाटपगुजरी कॉर्नर मंडळ व अन्य मंडळांसह महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व भाविकांकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. काही मंडळांनी परिसरात विद्युत रोषणाई केली होती; तर ‘रम्य सुंदर कोल्हापूर,’ ‘आई अंबे, नको पुन्हा महापूर’ अशा एक ना अनेक आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधत होत्या.