कोल्हापूर : शहरातील रंगीबेरंगी गणवेश परिधान केलेल्या सुमारे सहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी येथील गांधी मैदानावर मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता लक्षवेधी मानवी रांगोळी साकारली. रंगीबेरंगी गणवेश, टाळ्यांची लयबद्ध साथ आणि भारतमाता की जय अशा घोषणांनी दुमदुमलेला आसमंत अशा भारावलेल्या वातावरणात रंगलेल्या या रांगोळीने उपस्थितांना भारावून टाकले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, त्याचबरोबर शहरातील काही शाळांच्या सहकार्याने ‘देश का महात्यौहार’ या उपक्रमांतर्गत ही मानवी रांगोळी साकारण्यात आली. त्यामध्ये पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम. एल. जी., इंदुमतीदेवी, मनपा पी. बी. साळुंखे विद्यालय, एस. एम. लोहिया, प्रायव्हेट, विद्यापीठ, विमला गोयंका, इंदिरा गांधी, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, नेहरूनगर विद्यामंदिर, वीर कक्कय विद्यालय, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला. विद्यार्थ्यांनी ‘देश का महात्यौहार,’ ‘आय वुईल व्होट’ अशी अक्षरे रांगोळीद्वारे रेखाटली.
गांधी मैदानावर झालेल्या ही मानवी रांगोळी पाहण्यासाठी तसेच मतदारांना मतदान करा, असे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर उपस्थित होते.
प्रारंगी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी मानवी रांगोळी साकारण्यामागचा हेतू स्पष्ट केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमामुळे राज्यात एक वेगळा संदेश जाणार आहे. विद्यार्थी हे उद्याचे मतदार आहेत, त्यांच्यासह समाजातील नागरिकांना मतदानाबाबत जागृती व्हावी या हेतूने केलेल्या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्वांनी मतदानाची शपथ घेतली. तसेच मी मतदान करणार या अनुषंगाने सह्यांची मोहीमही राबविली.