कोल्हापूर : आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पंडित म्हणाले, क्रिकेटमध्ये शॉर्टकट नाही; त्यामुळे प्रथम श्रेणीचे सामने खेळणे क्रिकेटपटूला अनिवार्य आहे. हाच नमुना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घालून दिला आहे. पाच दिवसांच्या कसोटीमधून खेळाडूची क्षमता व कस लागतो. त्यातूनच हे तारे देशाला मिळतात.
टी-२० क्रिकेटमुळे कसोटीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी ‘आयसीसीआय’ घेत आहे. त्याकरिता क्रीडारसिकांना कसोटी सामने बघता यावेत म्हणून रात्रीचे कसोटी सामने खेळविण्याचा प्रस्ताव आहे. ‘बीसीसीआय’ही गावागावांमध्ये क्रिकेटचा प्रसार व्हावा, याकरिता विकासनिधी देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बिहारसारखे राज्यही रणजी सामने खेळण्यासाठी पुढे आले आहे.
विदर्भाने ८४ वर्षांनी रणजी करंडक जिंकला. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून मी काम करीत आहे. हा करंडक जिंकण्यासाठी केवळ विदर्भाच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना जिंकणे हे ध्येय ठरवून दिले होते. त्यामुळेच हा करंडक जिंकता आला.
क्रिकेट खेळात यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘आयपीएल’सह प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हे पुढे आले आहे. चांगले क्रिकेटपटू होण्यासाठी पॅशन व खेळातील सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे. शॉर्टकट क्रिकेटमध्ये चालत नाही. आज जरी ‘आयपीएल’सारख्या टी-२० स्पर्धांचा बोलबाला असला तरी त्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात आघाडीवर असलेल्याच खेळाडूंना स्थान मिळत आले आहे.
कसोटी जिवंत ठेवण्यासाठी ज्या खेळाडूने तीन वर्षे रणजी सामन्यात आपले कौशल्य दाखविले आहे, अशाच खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये स्थान द्यावे. त्यातून कसोटीकडेही दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळाडूंना खेळता येईल.यावेळी के. एस. ए.चे पदाधिकारी सरदार मोमीन, ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, संभाजीराव पाटील-मांगोरे, दीपक शेळके, ताज नांद्रेकर, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नीलराजे बावडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.त्या षटकाराची पुन्हा आठवणभारताचे माजी यष्टिरक्षक राहिलेल्या चंद्रकांत पंडित यांनी १९८६ साली शारजा येथे झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यात एका चेंडूवर चार धावा हव्या असताना जावेद मियॉँदादने चेतन शर्मा यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यावेळी संघात यष्टीमागे यष्टिरक्षण मी करीत होतो, अशी कटू आठवणही त्यांनी सांगितली.