शिवाजी पाटील-- कोकरुड -एकीकडे मुलगी जन्माला येऊ नये म्हणून तिला पोटातच मारणारे आहेत, तर दुसरीकडे मुलगी जन्माला यावी यासाठी प्रयत्न करणारेही आहेत. मुली जगाव्यात, मुलांच्या तुलनेत कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढवा, यासाठी रांजणवाडी (ता. शिराळा) येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांजवण विविध योजना राबवत आहेत.मेणी खोऱ्यातील दहा गावात जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव पोस्टात ठेवून, त्या मुलींच्या संगोपनाची पाच वर्षे जबाबदारी रांजणवाडी (ता. शिराळा) येथील उद्योजक सुरेश रांजवण यांनी उचलली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींना व्हावा, या हेतूने त्यांनी आणखी तीन गावांचा समावेश या उपक्रमात केला आहे. मुंबईस्थित उद्योजक सुरेश रांजवण यांनी सामाजिक बांधिलकीतून मुंबई तसेच शिराळा तालुक्यात पाच वर्षांपासून या उपक्रमास सुरुवात केली आहे. गरीब मुलांना दत्तक घेणे, वृध्दाश्रमांना मदत करणे, गरीब कुटुंबांना अर्थसाहाय्य करणे, प्रोत्साहनपर बक्षीस देणे, अपंगांना मदत करणे असे कार्य त्यांच्याकडून सुरु असते. आपली जन्मभूमी असलेल्या मेणी खोऱ्यातील रांजणवाडी, बेंगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेऊन त्यांनी या शाळेला सात लाखाची मदत केली आहे. खेळाडूंना बक्षीसरूपी मदतही केली आहे.गेल्या महिन्यापासून मेणी खोऱ्यातील दहा गावात जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावे पाच हजारांची ठेव पोस्ट खात्यात ते ठेवणार आहेत. तसेच या मुलींचा पाच वर्षांचा संगोपनाचा खर्चही ते देणार आहेत. या गावांतील मुलींना होणार लाभ...मेणी, रांजणवाडी, आटुगडेवाडी, बेंगडेवाडी, सावंतवाडी, माळवाडी, शिरसटवाडी, खटींगवाडी, पोळवस्ती, पाचगणी, मानेवाडी, गुढे, बांबरवाडी या गावांमध्ये १९ फेबु्रवारी (शिवजयंती) पासून जन्माला आलेल्या मुलींना हा लाभ मिळत आहे. कायमस्वरुपी ही योजना सुरु ठेवणार असल्याचे उद्योजक रांजवण यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
मुलींसाठी रांजणवाडी उद्योजकाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:08 AM