कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत रंकाळा सर्वधनाकरिता ४.८० कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध होण्यातील अडचणी लक्षात घेऊन रंकाळा संवर्धनाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाणार आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात या कामास सुरुवात करण्यात येईल असे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागातून सांगण्यात आले.कोल्हापूर शहराचे भूषण असलेला आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला रंकाळा तलाव; त्याच्या सभोवती असलेल्या संरक्षक भिंती, संध्यामठ, रंकाळा टॉवर, तसेच धुण्याच्या चाव्यांचे संवर्धन व डागडुजी करणे अतिशय महत्त्वाचे असल्याने तसा चार कोटी ८० लाखांचा प्रकल्प आराखडा बनवून तो राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन योजनेकडे पाठविण्यात आला होता. या प्रकल्पास मंजुरी मिळविण्याकरिता आमदार अमल महाडिक यांनी विशेष रस घेतला. त्यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प मंजूर झाला. त्याला प्रशासकीय मंजुरी आणि पहिला हप्ता म्हणून ५० लाखांचा निधी सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपलब्ध करून देण्यात आला.निधी प्राप्त झाल्यामुळे आता प्राधान्याने रंकाळा टॉवरच्या संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. ऐतिहासिक टॉवरचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये टॉवरचे बरेच नुकसान झाले असून, काही दगडे निसटले, फुटलेले आहेत. दोन्ही बाजूंचे दगडी रेलिंगही निखळलेले आहे. या सर्वांची डागडुजी करण्यात येणार आहे. काही दगड जसेच्या तसे घडवून बसवावे लागणार आहेत. नवीन दगड बसविताना त्यांना ऐतिहासिक बाज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.तलावात असलेल्या ‘संध्यामठा’चेही बरेच नुकसान झाले असून, त्याचे दगड निखळले आहेत. पिलर कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे त्याची डागडुजीही मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. पर्यटकांसह शहरवासीयांना सायंकाळच्या वेळी लाभ घेता येईल, असा नैसर्गिक सनसेट पॉइंट या ठिकाणी केला जाणार आहे.ही कामे करण्यात येणारपडझड झालेल्या संरक्षक भिंतीची डागडुजी करणे -२ कोटी ५६ लाख ५५ हजार ७७०निखळलेले दगड जसेच्या तसे घडवून बसविणे -७३ लाख ६६ हजार ८९०रंकाळा टॉवरचे सवंर्धन, डागडुजी करणे -४७ लाख ५४ हजार २११संध्यामठ व धुण्याची चावी संवर्धन, दुरुस्ती -१ कोटी ०२ लाख २८ हजार ३७८
रंकाळा संवर्धन कामाला जूनपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:45 AM