लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच संध्यामठ मंदिराचे पुरातन महत्त्व, क्रशर खण आदींची रविवारी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पाहणी केली. त्यांनी संपूर्ण पाहणी करून रंकाळा तलावाच्या विकासकामात हलगर्जीपणा करू नका, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अंबाई जलतरण तलावाच्या पाहणीवेळी दुर्गंधीयुक्त पाणी व अस्वच्छ स्वच्छतागृह आढळल्याने तेथील कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी रविवारी प्रथमच रंकाळा तलावाला भेट दिली. प्रथम जुना वाशी नाका येथील कदम खणीची पाहणी केली. सरनाईक कॉलनी, देशमुख हॉल, शाम हौसिंग सोसायटी, रंकाळा, परताळा आदी भागांतून रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती घेतली. त्यांच्यासोबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता आर. के. जाधव तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते. साप्ताहिक सुटीदिवशीच अंबाई जलतरण तलावास अचानक भेट दिल्याने तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. तलावातील पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक बैठक घेण्याचे आदेश दिले.बोटिंगचे दरफलक लावारंकाळा उद्यानात गेल्यानंतर त्यांनी देवराज बोटिंगची पाहणी केली. तेथील ठेकेदाराला बोलावून बोटिंग करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्राहकांना द्यावा लागणारा दरफलक येथे लावावा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिल्या.संध्यामठचा आराखडा करण्याची सूचनाऐतिहासिक संध्यामठ मंदिराची पाहणी करताना आयुक्त चौधरी यांनी या मंदिराचे पुरातत्त्व महत्त्व अबाधित ठेवून विकास करावा, त्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रकारे त्यांनी रंकाळा टॉवरनजीकच्या धुण्याच्या चावीचाही विषय कुतुहलतेने जाणून घेऊन त्याची पाहणी केली.
रंकाळा विकासकामात हलगर्जीपणा नको
By admin | Published: May 15, 2017 12:41 AM