अमर पाटील
कळंबा : कधीकाळी जैवविविधतेसह विविध प्रकारच्या मत्स्यजाती आढळणाऱ्या कळंबा आणि रंकाळा तलावास प्रदूषणाचे ग्रहण लागल्याने वाम, रोही, मरळ, कटला या जातीचे मोठ्या प्रमाणावर आढळणारे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येथील प्रदूषणाचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मत्स्यबीज विभागाच्या साहाय्याने रंकाळा तलावातील विविध मत्स्यजातींचा अभ्यास करून त्याचा अहवाल पर्यावरणतज्ञ उदय गायकवाड यांच्या समितीने पालिकेस सादर केला होता. त्यानुसार पूर्वी ७२ विविध प्रकारच्या प्रजातींचे मासे तलावात आढळून येत होते. २००९च्या पाहणीत फक्त ३० प्रजाती आढळून आल्या. पर्यावरण ऱ्हास, नैसर्गिक स्थित्यंतरे, जलपर्णीची व्याप्ती व वाढते प्रदूषण यामुळे माश्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तलाव संवर्धनासाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने येथील नैसर्गिक अधिवासाला बाधा पोहोचत असल्याचे चित्र आहे.
पूर्वी गोड्या पाण्यातील मासेमारी म्हटले की रंकाळा आणि कळंबा तलावाचे नाव पुढे येत होते. या भागातील हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालत होता. तलावात वाम, मरळ, कटला, रोही, शिंगटा, गुगळी, चिलाप, शिंगी, मंगुर, झिंगा, अरली, कानस, गवत्या, डोकरा, चांभोरी, बोदवा, असे नानाविध प्रकारचे मासे गळाला लागत होते. प्रदूषण वाढल्याने चिलापवगळता अन्य माश्यांची वाढ कमी होत आहे.
प्रदूषित पाण्यातही प्रचंड पचनशक्ती असल्याने चिलापाच्या वाढीस बळ मिळते त्यामुळे आजमितीला तलावात नव्वद टक्के निव्वळ चिलाप मासा सापडत आहे तर अन्य चवदार मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या दोन्ही तलावांमधील जैवविविधता कायम ठेवण्यासाठी पालिका जैवविविधता समिती व प्रशासनाने तलावात विविध प्रजातींचे मासे सोडून संवर्धन करणे गरजेचे आहे.