फुलेवाडी : मुसळधार पावसामुळे तब्बल १६ वर्षांनंतर रंकाळा टॉवरवरून पाणी ओसंडून वाहिल्यानंतर तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. मात्र, सध्या हाच रंकाळा टॉवर झुडपांच्या विळख्यात सापडला आहे. ऐतिहासिक रंकाळा पर्यटन केंद्र अनेकांना भुरळ घालते. सद्य:स्थितीत मात्र टॉवर परिसराला झुडपांचा, गवताचा विळखा घट्ट होत असल्याने रंकळ्याच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. या टॉवर परिसरात एखादा सुंदर सेल्फी पाॅईंट बनवा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. कोल्हापूर म्हणजे रंकाळा हे पर्यटनाचे समीकरण आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून रंकाळ्यास प्रदूषणाची साडेसाती लागली आहे. केंदाळ, पाण्यास दुर्गंधी, कचरा आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा टॉवर, पदपथ, उद्यान परिसरात झुडूप, गवत वाढले आहे. त्यामुळे येथील झुडपे, गवत काढावे, अशी मागणी होत आहे.
कोट : कोल्हापुरात फिरायला आल्यानंतर रंकाळ्याला भेट नाही असं होत नाही. तलाव परिसर सुंदर आहे. त्यामुळे पर्यटकांना भुरळ घालतो. येथे सातारा, पुणेच्या धर्तीवर सेल्फी पाॅईंट झाल्यास पर्यटकांना पर्वणी ठरेल.
वैशाली कोळी, पर्यटक.