कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेला नाही, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रंकाळ्यातील दोन पाणबदकांचा मृत्यू हा कुरकुरे, चिप्स आणि मिरच्या खाऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात बर्ड फ्लू आजाराचा अनेक ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी विविध पक्षी मृत्यू पावले आहेत. त्याची तपासणीही पुणे आणि भोपाळ येथे केली जाते. कोल्हापूर शहरात रंकाळा तलावातील दोन पाणबदके, सरनाईक कॉलनीत एक कबूतर, गडहिंग्लज शहरामध्ये दोन कावळे, चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे एक कावळा मृत आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
हे सर्व मृत पक्षी तपासणीसाठी औंध पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले. ज्या क्षेत्रामध्ये हे पक्षी मृत आढळून आले होते, तो परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. या सर्व पक्ष्यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट
कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड येथे काही पक्षी मृतावस्थेत आढळल्याने कुक्कुट पक्षीपालकांच्या मनात बर्ड फ्लूबाबत धास्ती निर्माण झाली होती. या पक्ष्यांचे बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. वाय. ए. पठाण
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कोल्हापूर
चौकट
महापालिकेने फलक लावण्याची गरज
रंकाळ्यासह कोल्हापूर शहरातील कोणत्याही तलावांमधील पक्ष्यांना काहीही खायला घालू नये, असे आवाहन करणारे फलक कोल्हापूर महापालिकेच्यावतीने लावण्याची गरज आहे. नागरिकांनीही असे खाण्याचे पदार्थ पक्ष्यांना घालू नयेत तसेच ते पाण्यात पडणार नाहीत याचीही काळजी घेण्याची गरज आहे.