हातकणंगले : कर चुकवेगिरीचे दोन नंबरचे व्यवसाय बाहेर काढण्याची धमकी देत उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पी. व्ही. सिंग (रा. दिल्ली) व रमेश ठक्कर (रा. मुंबई) या दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रमेश ठक्कर याला एक लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ठक्कर याला इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी संजय दानचद घोडावत (वय ५६, रा. यशवंत हॉसिंग सोसायटी, जयसिंंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संजय घोडावत ग्रुपने कर चुकविले आहेत. त्यामुळे याप्रकरणी धाड टाकून दोन नंबरचे धंदे बाहेर काढणार, तसे नको असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा घोडावत कुटुंबाला जिवे मारू, अशी धमकी पी. व्ही. सिंग व रमेश ठक्कर यांनी संजय घोडावत यांना फोन व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिली होती. यावरून संजय घोडावत यांनी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली होती. त्यानुसार हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पथक करून मुंबईला रवाना केले होते. या पथकाने रमेशकुमार प्रतापजी ठक्कर याला एक लाख रुपयाची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.