गडहिंग्लज : रावसाहेब अण्णा कित्तूरकर हे गडहिंग्लजच्या इतिहासातील एक थोर पुरुष होते. दानशूर व परोपकारी व्यक्ती म्हणून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सहकाराच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व आदर्श असे आहे. अशा त्यागी व महान व्यक्तींचा इतिहास विसरून चालणार नाही, असे मत निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज येथे विद्या प्रसारक मंडळातर्फे आयोजित 'श्रीमंत राजयोगी' रावसाहेब अण्णा कित्तूरकर चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रत्नमाला घाळी होत्या. चरित्रग्रंथाचे लेखन केल्याबद्दल प्रा. सुभाष कोरे यांचा महास्वामीजींच्या हस्ते सत्कार झाला.
महास्वामीजी म्हणाले, ग्रंथ हे माणसं घडवितात. मानवतेची शिक्षण व शिकवण देतात. ग्रंथाच्या संगतीने माणसाचे चारित्र्य घडते. उत्तम जीवन जगण्याचे बळ आणि आशावादी उमेद मिळते. मोबाइलच्या जमान्यात आताच्या पिढीने नको त्या वाईट गोष्ट घेण्यापेक्षा जीवन घडविण्यास मदत करणारी ऐतिहासिक माहिती घ्यावी. प्राचार्य जे. बी. बारदेस्कर व रामकुमार सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी अरविंद कित्तूरकर, अॅड. बी. जी. भोसकी, किशोर हंजी, महेश घाळी, अॅड. विश्वनाथ पाटील, बसवराज आजरी, राजशेखर दड्डी, रामाप्पा करिगार आदी उपस्थित होते. आशपाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. गजेंद्र बंदी यांनी आभार मानले.
-
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे 'श्रीमंत राजयोगी' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. डावीकडून बी. जी. भोसकी, अरविंद कित्तूरकर, रत्नमाला घाळी, सतीश घाळी, किशोर हंजी, गजेंद्र बंदी उपस्थित होते.
क्रमांक : २८०२२०२१-गड-०२