कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे सव्वा वर्षाच्या निरागस बालिकेवर पाशवी बलात्कार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने परप्रांतीय सेंट्रिंग कामगार, आरोपी राजेश बबली सिंग (वय ३०, मूळ रा. पेग, ता. नवाडी, जि. बोकारो, झारखंड) याला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आॅगस्ट २०१३ मध्ये कसबेकरांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते. हे काम ठेकेदार भरत शिंदे यांनी घेतले होते. त्यांचा मुकादम मिराज अन्सारी (रा. झारखंड) यांच्याकडे आरोपी राजेश हा कामगार म्हणून होता. याच बांधकामावर पीडित बालिकेचे वडील वॉचमनचे काम करीत होते. दि. १२ आॅगस्ट २०१३ रोजी बांधकाम सुरू असताना दुपारी पीडित बालिका खेळत होती. यावेळी आरोपीने इतर लोकांची नजर चुकवून तिला उचलून टेंबलाई मंदिराशेजारी असलेल्या मंगल कार्यालयाच्या बाथरूममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. दरम्यान, बालिका अचानक गायब झाल्याने तिचे आई-वडील तिला शोधत असताना मंगल कार्यालयाच्या बाथरूममधून तिच्या रडण्याचा आवाज आला. यावेळी बिथरलेल्या बालिकेची अवस्था असाहाय्य होती. तिला अतिरक्तस्राव होत होता. तिची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने कोल्हापुरात प्रचंड खळबळ माजली होती. संतप्त नागरिकांनी पळून जाणाऱ्या राजेश सिंग याला बेदम चोप देत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवस पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वेदपाठक यांच्यासमोर झाली. सरकारी वकील सुलक्ष्मी पाटील यांनी दहा साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक वैशाली जाधव, कॉन्स्टेबल योगेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एम. एन. कांबळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. (प्रतिनिधी)
बालिकेवर बलात्कार; सेंट्रिंग कामगारास जन्मठेप
By admin | Published: September 10, 2015 1:01 AM