कोल्हापूर : राफेल विमान करारप्रकरणी किंमत, प्रक्रिया व भागीदार कंपनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे, असे असतानाही आम्ही म्हणू तेच खरे, या मानसिकतेतून व खोटारडेपणातून कॉँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच विरोधकांची महाआघाडी ही कमजोर असून, जनता त्यांना नाकारून भाजपचे मजबूत सरकार देईल, असा टोलाही त्यांनी लगावला.उपाध्ये म्हणाले, राफेलप्रकरणी उत्तरे देण्याची तयारी असताना ती ऐकून घेण्याची मानसिकता कॉँग्रेसची नाही. सरकारने न्यायालयात याप्रकरणी चुकीची माहिती न देता योग्यच माहिती दिली आहे. देशात होत असलेली विरोधकांची कमजोर महाआघाडी ही स्वार्थापोटी झाली आहे.मोदींना साथ देणारा खासदारकोल्हापूरचा खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणारा निवडून येईल, असे विधान उपाध्ये यांनी केले. राम मंदिर हा भाजपसाठी आस्थेचा विषय असून, त्यासाठी आवश्यक त्या घटनात्मक गोष्टी पूर्ण करून तेथे मंदिर उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. युतीसंदर्भात सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनता सुज्ञ असून, ती या आघाडीला नाकारून भाजपच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार देईल, असे सांगून विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही; परंतु भाजपकडे नेता, दिशा व विकासाची दृष्टी स्पष्ट असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, बाबा देसाई, आर. डी. पाटील, दिलीप मैत्राणी, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, आदी उपस्थित होते.