कोल्हापूर : दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंमध्ये उसने पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून शिवीगाळ व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून युवकास मारण्याचा प्रयत्न व अन्य चार जणांवर रापीने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी इम्तियाज गुलाब मुजावर (वय ४७) व त्यांचा अल्पवयीन मुलगा (दोघेही रा. जुना मोटार स्टँड, निपाणी,ता. चिकोडी, बेळगाव) या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद समर्थ रणजित मंडलिक, (वय १९ रा. लाड चौक, नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ) याने दिली.पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, फिर्यादीसह अन्य चार खेळाडू व संशयित अल्पवयीन मुलगा हा दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रात नेमबाजीचा सराव करतात. या ठिकाणी संशयित व फिर्यादी यांच्यात पैसे देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. हा वाद रविवारी मिटवण्यात आला होता. मात्र, गुरुवारी दुपारी संशयित अल्पवयीन मुलाचे वडील पुन्हा या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी समर्थ यास केबलने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर अल्पवयीन मुलाने प्लास्टिक पाइपच्या तुकड्याने मारहाण केली. दरम्यान संशयित इम्तियाजने चप्पल कट करण्याच्या रापीने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करून जखमी केली. या दरम्यान संशयित इम्तियाजने फिर्यादीच्या वडिलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डाव्या डोळ्यावरील भुवयांवर, गालावर रापी मारून जखमी केले. भांडणे साेडविण्याकरिता आलेल्या प्रणव पोवार याच्या डावे काखेत व उजव्या हाताला, तर इंद्रजित पाटील याचे डाव्या हाताला व पायाला कुबेर कदम याचे मांडीला मारहाण करून जखमी केले.फिर्यादी समर्थच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून नुकसान केले,असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्याचे काम संशयितांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा तपास वैशाली पाटील करीत आहेत.
कोल्हापुरात राष्ट्रीय नेमबाजासह सहा जणांवर रापीने हल्ला, संशयितास जमावाची बेदम मारहाण
By सचिन भोसले | Published: October 26, 2023 5:26 PM