आशा स्वयंसेविकांची भूमिका ठरतेय महत्त्वाची
कसबा सांगाव : कागल तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असणारे कसबा सांगाव (ता. कागल) या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात दहा ते बारा दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे कालपासून कसबा सांगाव येथील बाजारपेठ चौकात रॅपिड अँटिजेन टेस्टला सुरुवात झाली.
त्यामध्ये आज तीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर एकूण संख्या ९० च्या घरात पोहोचली आहे, तर साठ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. यामध्ये आशा स्वयंसेविकांचे योगदान मोठे आहे. लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत ३४५८ इतक्या नागरिकांना लस दिली आहे. त्यामध्ये दि्वतीय लस घेणाऱ्यांची संख्या ७०० इतकी आहे .दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्यात आला आहे. पुन्हा १५ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका या दररोज घर टू घर सर्व्हे करत आहेत. गटप्रवर्तिका सुप्रिया गुदले, नलावडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पौर्णिमा शिंदे, आरोग्य कर्मचारी मधुकर लाटकर, शिवाजी घुले व त्यांचे सहकारी अहोरात्र काम करीत आहेत. माञ लोकसंख्या मोठी असल्याने दररोज चार-पाच पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. या लढाईत स्वत:ला झोकून दिलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती मनीषा देवडकर, ज्योती आवळे, सविता वरुटे, सारिका सावरकर, सौ. सुरेखा सुतार, सौ. माळी सौ. परीट, सौ. माने, सौ. कोळेकर आदींसह सर्वच आशा मोठ्या जोमाने काम करीत आहेत.
कसबा सांगाव येथे अनेक कुटुंब व्यवस्थाच बाधित होत आहेत. मात्र ज्यांना सौम्य लक्षणे आढळून येत आहेत असे अनेकजण निवांत गावामधून फेरफटका मारत आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजेन टेस्ट व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे कालपासून रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत.
खासगी हाॅस्पिटलमध्ये पाॅझिटिव्हची शंका असणारे अनेक रुग्ण दाखल होत आहेत. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही होत आहे. मात्र अशा रुग्णांची टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर शासकीय आरोग्य विभागाला कळवण्याची गरज खासगी हाॅस्पिटल्स घेत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तींचा आकडा किंवा रुग्णसंख्या शासकीय आरोग्य विभाग किंवा ग्रामपंचायतीला समजत नाही. त्यामुळे असे रुग्ण निवांत गावामधून फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. अशा खासगी हाॅस्पिटल्सवर कारवाई व्हावी अशी मागणी सरपंच रणजित कांबळे व वैद्यकीय अधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ---------------------------------------------------------------------------------------------------- फोटो कॅप्शन. :
कसबा सांगाव (ता. कागल) येथील बाजारपेठ चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी, सोबत सरपंच रणजित कांबळे व नागरिक.