लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात संदीप डेव्हिड सौंदडे (वय २२, रा. महादेवनगर, सांगली) या युवकावर हृदयावरील दुर्मीळातील दुर्मीळ अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याला वाचविण्यात यश आल्याची माहिती हृदयरोग शल्यविशारद तज्ज्ञ डॉ. माजिद मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली येथील संदीप यास काही दिवसांपासून ताप येत होता. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले. या तापानंतर त्याला चालता-बोलता किंवा अन्न खाताही येईना. अशा परिस्थितीत मिरज येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर उपचारासाठी येणारा खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे नातेवाइकांनी सुचविल्यानुसार संदीप व त्याची आई अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना भेटले. त्यानुसार रुग्णाची स्थिती पाहता रुग्णावर तातडीने हृदयशस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यानुसार वैद्यकीय अहवाल पाहता, त्याला रक्तामध्ये जंतूसंसर्ग झाल्याचे पुढे आले. अशावेळी रुग्ण औषधोपचारास प्रतिसाद देईना म्हणून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. ही शस्त्रक्रिया ही दुर्मीळातील दुर्मीळ म्हणून गणली गेली. कारण रुग्णाचे मूत्रपिंड, लिव्हर, खराब होऊन जंतूसंसर्ग झाला होता. त्यात हृदयाची झडप, व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक बाब होती. अशाप्रकारे रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण दगावण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया धोका पत्करून करण्यात आली. या शस्त्रक्रियेत रुग्ण संदीपच्या हृदयाच्या झडपा, धातूचा कृत्रिम व्हॉल्व्ह बदलण्यात आला तर औषधौपचाराने मूत्रपिंंड, लिव्हरही पूर्ववत करण्यात यश आले. १३ जून २०१७ ला चार तासांहून अधिक काळ झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता पूर्ववत आयुष्य जगत आहे. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, सी.व्ही.टी.सी. विभागप्रमुख डॉ. रणजित जाधव, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील, डॉ. रणजित पवार, आदी उपस्थित होते.रुग्ण संदीप सौंदडे या बावीस वर्षीय रुग्णावर दुर्मीळातील दुर्मीळ अशी शस्त्रक्रिया डॉ. माजिद मुल्ला यांनी केली. त्यास मार्गदर्शन डॉ. रणजित जाधव यांनी केले. डॉ. कौशिक पाटील, डॉ. रणजित पवार, डॉ. हेमलता देसाई, कर्मचारी वर्ग अरुण पाटील, स्वाती क्षीरसागर, सुनंदा शिंदे, अश्विनी सारदाळ यांनी सहाय केले. अशाप्रकारे ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंर्तगत (राजीव गांधी जीवनदायी योजना)मधून पूर्णपणे मोफत केली आहे.४काही काळानंतर पुन्हा एकदा सीपीआरमधील हृदयरोग विभाग पुन्हा सक्षमपणे कार्यरत होत आहे. या विभागात ४ हृदयरोग शल्यविशारद, तर ३ हृदयरोगतज्ज्ञ असे ७ तज्ज्ञ या विभागात कार्यरत आहेत. रुग्णांनीही बिनदिक्कतपणे उपचारासाठी यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केले.
दुर्मीळ हृदय शस्त्रक्रियेने जीवदान
By admin | Published: June 30, 2017 1:09 AM