लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली-दोडामार्गच्या जंगलात स्थानिक निसर्गप्रेमींना दुर्मीळ ‘लाजवंती’ म्हणजेच ‘स्लेंडर लोरीस’ या माकडकुळातील प्राण्याचे दर्शन घडले आहे. शनिवारी रात्री येथील निसर्गप्रेमींना हा प्राणी आढळून आला. वन्यजीव मंडळाने जाहीर केलेल्या आंबोली आणि दोडामार्ग या संवर्धन राखीव वनक्षेत्रात (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) हा प्राणी आढळला आहे. मात्र, या दुर्मीळ प्राण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मधील त्याचे नेमके स्थान गुप्त ठेवण्यात आले आहे.
‘लाजवंती’ निशाचर असून तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ देखील म्हटले जाते. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. लाजवंतीचा आकार ४० सेंटिमीटर असून त्याचे वजन १८० ग्रॅम असते.
‘लाजवंती’ या माकड कुळातील दुर्मीळ प्राण्याचे वास्तव्य भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांमध्ये आढळते. पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये ‘लाजवंती’चे वास्तव्य असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही केवळ तिलारी आणि परिसरातच हा प्राणी आढळतो.
गेल्याच महिन्यात राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीने सरकारने नव्यानेच घोषित केलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग’ संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये या दुर्मीळ प्राण्याचे दर्शन स्थानिक निसर्गप्रेमी संजय सावंत, तुषार देसाई, अमित सुतार आणि संजय नाटेकर यांना झाले.
कोट
शनिवारी रात्री निसर्गभ्रमंतीदरम्यान ‘लाजवंती’ हा प्राणी आम्हाला आढळून आला आहे. या प्राण्याचे छायाचित्रही मिळविण्यात यश आले आहे.
- संजय सावंत, निसर्गप्रेमी
फोटो : २११२२०२० कोल लाजवंती माकड