सरदार चौगुले ---पोर्ले तर्फ ठाणे --बिनविषारी, लांबीने कमी, शरीराने जाड व रेताड मातीत राहणारा सुस्त स्वभावाचा दुर्मीळ डुरक्या घोणस पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील परशरामाच्या डागला दहा वर्षांनी सापडला. त्याला सुरक्षित ठिकाणी सर्पमित्र कृष्णात सातपुते यांनी सोडून दिले. शेती पिकांचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे मुख्य अन्न असल्याने ‘शेतकऱ्यांंचा मित्र’ या नावाने तो परिचित आहे. मात्र, दिसला साप की ‘हाण’ काठी या मानसिकतेमुळे सरपटणारे प्राणी दुर्मीळ होत आहेत.डुरक्या घोणस हा सुस्त निशाचर (रात्री फिरणारा) सर्प आहे. मुख्यत्वे रेताड मातीत अथवा दगड-विटांच्या ढिगाऱ्यात राहणे तो पसंत करतो. अंधार पडल्यावर उंदराच्या बिळाशेजारी तोंड काढून शिकारीची प्रतीक्षा करतो. उंदीर, घुशी, सरडे व पक्षी हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे. इतर सरपटणारे प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात; पण घोणस मादी मे ते जुलै महिन्यांत सहा ते आठ पिल्लांना जन्म देते. पिल्ले जन्मत:च फुसफुसतात व डूर्रर्र डूर्रर्र असा आवाज काढतात; म्हणून त्याला ‘डुरक्या’ या नावाने संबोधले जाते. डुरक्या घोणसाचे तोंड आणि शेपूट दिसायला सारखे असल्याने सहा महिन्यांच्या टप्प्याने आलटून पालटून चालतो; म्हणून तो दुतोंडी आहे, असा लोकांमध्ये गैरसमज आहे. गैरसमजुती आणि अज्ञानपणामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रबोधनाची गरज आहे, अशी खंत सर्पमित्र कृष्णात सातपुते यांनी व्यक्त केली. वैशिष्ट्येदोन ते अडीच फूट लांबी, डोक्यावर छोटे खरखरीत खवले, जाड गोलाकार शरीर, टोकदार खरखरीत शेपूट, रंगाने मातकट किंवा तपकिरी, शरीरावर गडद तपकिरी धब्बे.सतत शरीराचे वेटोळे पद्धतीने तोंड लपवून घेण्याची सवय, ही डुरक्या घोणस ओळखण्याची वैशिष्ट्ये आहेत.
पोर्लेत दुर्मीळ डुरक्या घोणस
By admin | Published: January 31, 2017 11:17 PM