संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहतात ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार; अथवा सहभोजनाचे नियोजन. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुपने या भिशीची नवी संकल्पना मांडली आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लावला आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत.
शहरातील डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रमुख अशा ४५ जणांचा ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुप व्यावसायिक अवनीश जैन यांनी सुरू केला. यात २३ ते ६० वयापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रुपसमोर जैन यांनी ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. त्याला सर्वच सदस्यांनी प्रतिसाद दिला. जूनमध्ये या ग्रुपने उपक्रमाची सुरुवात केली. यानंतर आतापर्यंत शहरातील राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल, विक्रम हायस्कूल व डॉ. झाकीर हुसेन शाळेचा परिसर, आदी ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत. या उपक्रमांतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत शहरात पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या ग्रुपचा हा उपक्रम अनेकांना ‘ग्रीन व्हिजन’ देणारा आहे.‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधानांकडून विशेष दखलभन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ ही बातमी आॅनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टिष्ट्वट करून पर्यावरण रक्षण करणाºयांना प्रोत्साहन दिले आहे. त्यानंतर टिष्ट्वटरवर देशभरातील अनेकांनी यावर आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील काहींनी ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली.
वृक्षारोपणासह देखभालहीसोलापूरमधील एक व्हॉट्स अॅप ग्रुप पर्यावरण रक्षणासाठी या भिशीच्या पद्धतीने वृक्षारोपण करीत असल्याचे वाचनात आले. अशी संकल्पना कोल्हापुरात राबविण्याची कल्पना ग्रुपसमोर मांडली व झाडांची भिशी सुरू झाली. जून ते आॅक्टोबरपर्यंत झाडे लावायची आणि नोव्हेंबर ते जूनपर्यंत त्यांची देखभाल करण्याचे आम्ही ठरविल्याचे ग्रीन व्हिजन ग्रुपचे प्रमुख अवनीश जैन यांनी सांगितले.
अनेकदा भिशीकडे एक चैनीची बाब म्हणून पाहिले जाते; पण, आमच्या ग्रुपने झाडांची भिशी सुरू करून पर्यावरण रक्षणाला बळ देण्याचे पाऊल टाकले आहे. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून शहर सौंदर्यीकरणाला हातभार लावण्याचे व शुद्ध हवेसाठी ग्रीन पॅचेस तयार करण्याचे नियोजन आहे.- मिलिंद धोंड, संस्थापक-सदस्य, ग्रीन व्हिजन ग्रुप