कोल्हापूर : प्राणी, पक्ष्यांची विष्ठा आणि संसर्गातून माणसांमध्ये पसरणाऱ्या बर्ड फ्लूचे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात साथ नाही, तरीदेखील प्रशासनाने आतापासून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राशिवडे बुद्रुक ते चांदे रोडवर मृत कोंबड्या फेकल्याच्या बातमीनंतर नियंत्रण समितीने मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता घटनास्थळाची पाहणी करून, खरा प्रकार सर्वांसमोर आणला. तेथे मृत कोंबड्या नव्हेत, तर पक्ष्यांची पिसे व काडीकचऱ्याने भरलेले एक पाेते होते, हे लक्षात आल्यानंतर शासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
बर्ड फ्लूची साथ परभणीत सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने तातडीने बैठका घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी कोल्हापुरातही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांच्यासमवेत बैठक घेऊन नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समिती स्थापन होऊन चार तास उलटत नाहीत, तोवर राशिवडे बुद्रुक ते चांदे रोडवर शंभर कोंबड्या फेकल्याचे वृत्त येऊन थडकले. तातडीने या समितीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मध्यरात्री दीड वाजता पाहणी केल्यानंतर, तेथे मृत कोंबड्या नसून चिकनच्या दुकानातील कोंबड्यांची पिसे व काडीकचरा आढळून आला.
चौकट ०१
जिल्ह्यातील ५५० नमुने पुण्याला पाठविले
पशुसंवर्धन विभागाकडून आजारी असणाऱ्या कोंबड्यांचे ५५० नमुने पुण्यातील विभागीय रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल चार दिवसात प्राप्त होणार आहेत.
चौकट ०२
चिकनचे दर आदळले
चिकन व अंडी शिजवून खाल्ली जात असल्याने बर्ड फ्लूग्रस्त काेंबडी असली तरी, त्याचा आरोग्यावर काही परिणाम होत नाही, असे कितीही ओरडून सांगितले, तरी लोक ऐकायला तयार नाहीत. प्रबोधनापेक्षा अफवांचे पीक जास्त झाल्याचा परिणाम चिकन, अंड्यांच्या दरावर झाला आहे. चिकनच्या दरात किलोमागे ५० रुपयांनी घट झाली आहे, तर अंड्यांच्या दरातही डझनामागे १० ते २० रुपयांचा फरक पडला आहे.
प्रतिक्रिया
कोल्हापुरात बर्ड फ्लूची साथ आलेली नाही, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त पोल्ट्रीमधील कोंबड्या स्वच्छ, निर्जंतुक राहतील एवढीच काळजी घ्या. शिजवलेले चिकन, अंडी खाण्यासही कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
- डॉ. वाय. ए. पठाण, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, कोल्हापूर