चंदगड : हलकर्णी औधोगिक वसाहतीमध्ये सूरू असलेल्या रविकिरण पेपर मिलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचा संप सुरू आहे. दरम्यान, आज पाटणेफाटा येथे बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास रस्ता रोखल्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या सहा महिन्यांपासून गांधीगिरी पद्धतीने रविकिरण पेपर मिलच्या कामगारांनी आंदोलन आणि अलीकडे उपोषणाला प्रारंभ केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत कामगारांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन यावेळी पो. नि. बी. ए. तळेकर यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. रविकिरण पेपर मिलचे जवळपास ६५ कामगार सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कंपनीने त्यांची दखल घेतली नाही. कायम कामगारांना कंत्राटी करणे, शासकीय नियमाने देय असलेला महागाई भत्ता न देणे, शासकीय आदेश न पाळणे, बिहारमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन काम करणे आदी प्रकारचे अन्याय कंपनी करत आहे. अखेर आनंद गणपती पारशे व सोमनाथ गोविंद गावडे पार्ले यांनी सर्व कामगारांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले. तालुक्यातील कोणत्याच राजकीय तसेच प्रशासन अधिकाऱ्यांना कंपनीने दाद दिली नाही.
यावेळी बोलताना माजी मंत्री भरमूआण्णा म्हणाले, संप आठ दिवसांत मिटला नाही तर, चंदगड तालुक्याशी गाठ आहे. हा प्रश्न सन्मानाने सोडवावा. अन्यथा मुजोरांना कायमचा धडा शिकवावा लागेल, असा गर्भित इशारा दिला. कामगार संघटनेचे नेते कॉ. अतुल दिघे म्हणाले, स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार दिला पाहिजे असा कायदा असताना मालक मानत नाहीत, त्यांची घमेंड उतरावी लागेल. वकील संतोष मळवीकर म्हणाले, एव्हीएचची पुनरावृत्ती करू देऊ नका, आमचा अंत पाहू नका. अन्यथा कृती करून दाखवावी लागेल. प्रा. एन. एस. पाटील, विष्णू गावडे, सुभाष देसाई यांची भाषणे झाली.विलास पाटील, ॲड संतोष मळवीकर तानाजी गडकरी, रुद्राप्पा तेली, जानबा चौगुले, अमित वरपे, पांडुरंग बेनके, सुभाष देसाई, विष्णू कार्वेकर, प्रताप डसके,मनोज रावराणे, विष्णू गावडे आदी उपस्थित होते.
चौकट :
उपोषण करून आम्हीच आमचा बळी ठरू
गांधीगिरी पद्धतीने यापुढे उपोषण बंद, आता तोडफोडीची लढाई करावी लागेल. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा दोषी असतो. त्यामुळे उपोषण बंद करून उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी देऊन उपोषण अस्त्र बंद करण्यात आले.
फोटो ओळी: --
पाटणे फाटा : रविकिरण पेपर मिलच्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय नेते व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनात बोलताना माजी मंत्री भरमूअण्णा पाटील