लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : व्याधीग्रस्त व ज्येष्ठांना कोरोना लस देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिकेची आरोग्य केंद्रे, उपजिल्हा-ग्रामीण रुग्णालये अशी १०४ केंद्रे व १६ खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आरोग्य केंद्रांवर एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत तर खासगी रुग्णालयात ती २५० रुपयांना दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील भाैगोलिक रचनेनुसार १० तालुके डोंगराळ भागात असल्याने खास बाब म्हणून सर्वच आरोग्य केंद्रांवर लसीकरण उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात १५० रुपयांना लस व सेवा चार्ज १०० रुपये असे २५० रुपये द्यावे लागणार आहेत.
सध्या लसीचे ६० हजारांवर डोस उपलब्ध असून, केंद्रांवर प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. गावागावातून एकाचवेळी नावनोंदणी केली जाऊ नये, किंवा सगळ्या नागरिकांनी एकाच दिवशी, एकाच वेळी गर्दी करू नये, यासाठी गावपातळीवर केंद्रनिहाय ग्रामपंचायतींनी, सरपंच व सदस्यांनी तर शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्यात यावे. सध्या आरोग्य केंद्रांसोबतच १५ खासगी दवाखान्यात ही लस उपलब्ध असून, गरजेनुसार महात्मा फुले योजनेत सहभागी असलेल्या रुग्णालयांना यात सामावून घेण्यात येणार आहे.
कोरोनामुळे एकाही नागरिकाचा मृत्यू होऊ नये हे ध्येय पूर्ण करण्यासाठी व्याधीग्रस्त व ज्येष्ठांनी अवश्य लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनास सहकार्य करावे.
दौलत देसाई
जिल्हाधिकारी कोल्हापूर..
नियोजन असे..
दुसरा डोस असलेल्यांना सर्वांत आधी प्राधान्य
त्यानंतर ऑनलाइन नोंदणीचे नागरिक
शेवटी स्पॉट नोंदणीस संधी
दिवसाला एका केंद्रावर शंभर नागरिकांनाच लस
लसीकरण केंद्रे
तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे : ७५
उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये : २१
महापालिका आरोग्य केंद्रे : ६
खासगी रुग्णालये : १६
--
उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये
ग्रामीण रुग्णालय आजरा, गारगोटी, चंदगड, नेसरी, गगनबावडा, पारगाव, हातकणंगले, कागल, मुरगुड, खुपिरे, पन्हाळा, राधानगरी, सोळांकुर, मलककापूर, शिरोळ, दत्तवाड, उ. सेवा रुग्णालय बावडा, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर, उपजिल्हा रुग्णालय कोडोली.
---
मनपा लसीकरण केंद्रे
सीपीआर रुग्णालय, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा रुग्णालय, आरोग्य केंद्र सिद्धार्थनगर, राजारामपुरी, महाडिक माळ, फिरंगाई, सदर बाजार.
--