‘वेलदोडा’चा किलोचा दर सहा हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:02 PM
सचिन भोसले - कोल्हापूर : चहा, खीर, बासुंदी, कंदी पेढे, सुगंधी मसाले दूध, मसाले भात, गूळ पोळी, पुरणपोळी एवढंच ...
सचिन भोसले -कोल्हापूर : चहा, खीर, बासुंदी, कंदी पेढे, सुगंधी मसाले दूध, मसाले भात, गूळ पोळी, पुरणपोळी एवढंच काय तर श्रावणातल्या सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादाची चव आणि स्वाद वेलदोड्याशिवाय पूर्ण होत नाही. अशा या हिरव्या वेलदोड्याची चव सर्वसामान्यांपासून दुरापस्त होऊ लागली आहे. कारण या वेलदोड्याचा बाजारातील किलोचा दर सहा हजार रुपयांवर गेला आहे.नेहमीच्या मसाल्यांमध्ये वेलदोडा हमखास असतो. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. याशिवाय चहा, खीर, बासुंदी, पेढे, मसाले दूध यांमध्ये वेलदोड्याची पावडर चव आणि स्वाद वाढविण्यासाठी वापरली जाते. वेलदोडा केरळ, तमिळनाडूमध्ये पिकतो. तेथून तो संपूर्ण भारतासह परदेशातही पाठविला जातो. मात्र, या हिरव्या वेलदोड्याला मागील वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे पीक पावसात वाहून गेले. तमिळनाडूमध्ये मागील वर्षी परतीचा पाऊसच झाला नाही. त्यात पिकेच जळून गेली. त्याचा नेमका परिणाम म्हणून कमी प्रमाणात उत्पादन निघाले. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती झाल्याने दरही चढेच राहिले.मागील वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी व फेबु्रवारी महिन्यांत २००० रुपये इतका किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा भाव होता. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये २००० ते २६०० इतका झाला. दिवाळीत तीन हजार इतका झाला. जानेवारी २०१९ मध्ये हाच भाव तीन हजार रुपयांवर पोहोचला. जून महिन्यात दराचा कहर झाला व किलोचा भाव सहा हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचला.सर्वसामान्य ग्राहकाला दहा ग्रॅम वेलदोडा घ्यायचा असेल तर त्याला साठ रूपये मोजावे लागतात. हा दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच म्हणावा लागेल. सणासुदीचा काळ असला तरी वेलदोडा महाग असल्याने मसाले बाजारातील त्याची उलाढाल मंदावली आहे. याला पर्याय म्हणून परदेशातूनही मालाची काही प्रमाणात आवक झाली आहे.