गणेश शिंदे ।कोल्हापूर : मोठा गाजावाजा करून रिक्षांना ई-मीटर बसविली पण गेल्या सहा महिन्यांत शहरातील बहुतांश रिक्षांचे ई-मीटर डाऊन झाले आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसत असून एकाच मार्गावर धावणाºया दोन रिक्षांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या डोळेझाकपणाचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
रिक्षा व टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये रिक्षांना ई-मीटर बसविणे बंधनकारक केले. भाडे आकारणीत सुसूत्रता येऊन प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश होता. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिका हद्दीतील रिक्षाचालकांना ई-मीटर सक्तीचे केले.
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाकडे सन २०१४ पर्यंत जिल्ह्यातील ५८८१ जुन्या रिक्षांना ई-मीटर बसविल्याची नोंद आहे. मात्र, सन २०१५ नंतर नवीन रिक्षांना कंपनीकडूनच ई-मीटर बसवून त्याची विक्री होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगितले.दरम्यान, सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून सन २०१४ मध्ये शहरातील लोकप्रतिनिधींनी रिक्षाचालकांना ई-मीटर मोफत दिली. त्यामुळे रिक्षाचालकांचा ई-मीटर घेण्याचा प्रश्न मिटला. साधारणत: एक-दोन वर्षे झाल्यानंतर रिक्षाचालकांनी ई-मीटर पद्धतीने भाडे आकारणी केली; पण, कालांतराने काही रिक्षाचालकांनी ई-मीटर बंद असल्याचे सांगून ठरवून भाडे आकारण्याची पद्धत सुरू केली. हळूहळू ही पद्धत रूढ होत गेली. परिणामी, एकाच मार्गावर, एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जाऊ लागले. काही रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे प्रामाणिक रिक्षाचालकही बदनाम होऊ लागले आहेत. शहरात सुमारे १० हजारांवर रिक्षा धावतात. सद्य:स्थितीत त्यातील बहुतांश रिक्षाचालकांकडून ई-मीटर बंद असल्याचे कारण सांगितले जाते. त्याचबरोबर रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिक्षाचा असलेला दीडपट आकार हा रात्री साडेअकरा वाजल्यापासून आकारला जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांमधून होत आहेत.‘आरटीओ’ विभाग करतोय काय?वास्तविक, तपासणीवेळी रिक्षाच्या सर्व बाबी तपासणे ही प्रादेशिक परिवहन विभागाची जबाबदारी आहे. कोणत्या रिक्षांना ई-मीटर आहे, कोणत्या नाही याची माहिती संबंधित अधिकाºयांनी प्रशासनाला देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग करतो तरी काय ? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
शहरातील ९० टक्के रिक्षाचालक ई-मीटरची अंमलबजावणी करतात; पण, काही रिक्षाचालकांकडून ई-मीटरची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होतात. जास्त दर घेतल्यास प्रवाशांनी पोलीस अथवा ‘प्रादेशिक परिवहन’कडे थेट तक्रार करावी.- राजेंद्र जाधव, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना,कोल्हापूर.ई -मीटर पद्धतीने रिक्षाचालकाकडून भाडे घेतले जात नसेल तर प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे थेट लेखी तक्रार द्याव्यात. त्यावर निश्चित कारवाई करू. -डॉ. एस. टी. अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहनअधिकारी, कोल्हापूर.