अतुल आंबी - इचलकरंजी -शिधापत्रिकेला आधार कार्ड व बॅँक खाते संलग्न करण्याच्या योजनेमध्ये इचलकरंजी शहर परिसरात सावळागोंधळ सुरूच आहे. नागरिकांना बॅँकेत व आधार कार्ड काढण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्याचबरोबर आर्थिक भुर्दंडही बसत आहे. याबाबत प्रशासन मात्र गांधारीची भूमिका साकारताना दिसत आहे.कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे नाव शिधापत्रिकेवर लावण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचे आधार कार्ड व आयएफएससी कोड नंबर असणाऱ्या बॅँकेमध्ये खाते आवश्यक आहे. त्यानुसार महिलांना बॅँकेत खाती उघडावी लागत आहेत. शासनाने सर्वसामान्य जनतेचा विचार करून सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांना जन-धन योजनेंतर्गत शून्य रुपयाचे खाते उघडण्याचे आदेश दिले. मात्र, बॅँकांनी या आदेशाची पायमल्ली करत मनमानी कारभार सुरू केला. शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम भरून घेऊनच नवीन बचत खाती काढली जात आहेत. त्यात हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे खाते नंबर व आयएफएससी कोड नंबर मिळायला पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे रेशन दुकानातील लिंकिंग प्रक्रिया थंडावली आहे.शिधापत्रिका व बॅँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने ज्या महिलांचे आधार कार्ड पूर्वी काढूनही आले नाही व ज्यांना नवीन काढायचे आहे, अशा महिलांनी आधार कार्ड केंद्रांवर गर्दी केली आहे. प्राधान्याने आधार कार्ड मिळण्यासाठी अनेक महिला पहाटे पाच वाजल्यांपासून केंद्राच्या दारात रांगा लावत आहेत. याचा गैरफायदा घेत काही ई-सेवा केंद्र व आधार कार्ड केंद्रधारकांनी आर्थिक फायदा लाटण्यास सुरूवात केली आहे. ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे. तर काही केंद्रांवर २०० रुपये दिल्यास अर्जंट कार्ड मिळण्याचीही सोय करण्यात आली असल्याची चर्चा आहे. सोमवारी (दि.९ फेब्रुवारी) यासंदर्भात येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी आधार केंद्रधारक व बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. मात्र, त्याचा कोणताच परिणाम यंत्रणेवर झाल्याचे दिसत नाही. उलट यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरू आहे. परिणामी याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आधार केंद्रचालकांची अरेरावीएएससी महाविद्यालय परिसरातील एका आधार केंद्रावर गुरूवारी सायंकाळी बंद करण्याच्या वेळेस गोंधळ झाल्याने नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी केंद्रचालकाने शुक्रवारी केंद्र मुद्दाम बंद ठेवले. त्याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. तसेच राधाकृष्ण चित्रमंदिर येथील केंद्र गुरुवारपासून बंदच असून, भाग्यरेखा थिएटरसमोरील केंद्र अद्याप सरू झालेलेच नाही.गरिबाला कोण वाली नाही. गेल्या चार दिवसांपासून सहा महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन हेलपाटे मारल्यानंतर शुक्रवारी आधार कार्ड काढण्यासाठी नंबर आला. आधार कार्ड काढले असले तरी कार्ड यायला किती दिवस लागणार, याची माहिती दिली जात नाही. - जास्मीन मुजावर (इचलकरंजी)एएससी महाविद्यालय, जवाहरनगर, जुनी नगरपालिका या सर्व ठिकाणी पायपीट करून शेवटी शुक्रवारी सकाळी गावचावडीजवळील आधार कार्ड केंद्रावर कार्ड काढण्यासाठी आलो आहे. येथेही नंबर आला तरच आज काम होईल; अन्यथा उद्या यावे लागेल, असे सांगितले जात आहे.- अलका वीर (कबनूर)आर्थिक पिळवणूकआधार केंद्राच्या परिसरामध्ये विनामूल्य फॉर्म मिळण्याची सोय असतानाही फॉर्मची किंमत पाच रुपये, तर लिहिण्यासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. तसेच झेरॉक्स प्रत काढण्याचे दरसुद्धा एक रुपयावरून दोन रुपये करण्यात आले आहे.
रेशन लिंकिंगचा सावळागोंधळ सुरूच
By admin | Published: February 13, 2015 9:02 PM