कोल्हापूर : सांगली शहरातील एजंटाने पाठवलेला रेशनचा तांदूळ संशयावरून राजारामपुरी पोलिसांनी नाकबंदी दरम्यान रविवारी रात्री पकडला. पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपयांची तांदळाची ३४७ पोती आणि पाच लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला.
ट्रकचालक दस्तगीर पिरजादे (रा. शंभर फुटीरोड, भोसले प्लॉट, रज्जाक गॅरेजमागे, सांगली) आणि तांदूळ व्यापारी फिरोज जित्तीकर (रा. पाकिजा मस्जिद, २री गल्ली, सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले. कोल्हापुरात खुल्या बाजारात विक्रीसाठी आणल्याच्या संशयावरून ही कारवाई केली.शनिवारी रात्री जिल्ह्यात नाकाबंदी पोलिसांनी नाकाबांदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. यादरम्यान सांगलीहून धान्य भरून एक ट्रक कोल्हापूर शहरात प्रवेश करत होता.नाकाबंदीवरील पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पोलीस कर्मचारी अनिल चिले, उत्तम माने यांनी संशयावरून हा ट्रक अडवून त्याची तपासणी केली.
त्या ट्रकमध्ये तांदळाची ३४७ पोती आढळली. धान्याच्या खरेदी-विक्रीची पावती पोलिसांनी ट्रकचालकाकडे मागितली, पण कोणताही परवानाचालकाने सादर केला नसल्याने पोलिसांनी सोमवारी पहाटे ट्रक ताब्यात घेतला.सांगली शहरातील शंभर फुटीरोडवर राहणारे फिरोज जित्तीकर हे तांदळाचे व्यापारी आहेत. रेशनचा तांदूळ कोल्हापूर परिसरातील एका राइस मिलमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती ट्रकचालक पिरजादे यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, रेशनचा तांदूळ विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये भरून तो कोणत्याही प्राधिकृत परवानगीशिवाय विक्री करण्यासाठी कोल्हापुरात आणल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, ट्रकचालक पिरजादे आणि तांदूळ व्यापारी जित्तीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.