शिये
: प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग शिये, भुये, केर्लो या गावातून न घेता हातकणंगले, वाठर, बोरपाडळे या अस्तित्वात असणाऱ्या शंभर फुटी रोडवरून करावा, अशी मागणी महामार्ग विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी - नागपूर महामार्ग शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, निगवे, कुशिरे, केर्ली या मार्गावरून प्रस्तावित आहे. कोल्हापूर शहराचा याच भागातून रिंग रोडही जाणार आहे. यासाठी मार्च २०१७ च्या अर्थसंकल्पात ३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमधून कोकणाला जोडणारा रेल्वेमार्गही याच गावांतून प्रस्तावित आहे. येथूनच हे सर्व प्रकल्प झाल्यास येथील बहुतांशी शेतकरी भूमिहीन होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य मार्ग १९४ वर महापुरा वेळी दीड किलोमीटर अंतरावर दहा फुट पाणी आले होते. या ठिकाणी भराव टाकल्यास शहरासह आसपासचा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. महामार्गावरील भरावामुळे शेतीत पाणी राहिल्याने शेती नापीक होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर महामार्ग हातकणंगले, वाठार, वारणा, बोरपाडळे या मार्गावरून अस्तित्वात असलेल्या शंभर फुटी रोडवरून करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, कृष्णात पोवार, अभिजित पाटील, ॲड. माणिक शिंदे, भानुदास पाटील, सतीश कुरणे, देऊ पाटील, विक्रम पाटील उपस्थित होते.
फोटो : ०६ शिये निवेदन
प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर महामार्ग वाठारमार्गे करा, अशी मागणी भूसंपादन विरोधी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.