गडहिंग्लज : गेल्या आर्थिक वर्षात श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या ठेवीमध्ये ५५ कोटींनी वाढ झाली. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेत ३११ कोटींच्या ठेवी आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या वर्षातदेखील संस्थेची कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्तम राहिली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.चौगुले म्हणाले, ३१ मार्चअखेर संस्थेची सभासद संख्या ८०६३ आहे. एकूण ठेवी ३११ कोटी तर २१९ कोटीची कर्जे आहेत. खेळते भांडवल ३४६ कोटीचे असून एकूण गुंतवणूक १११ कोटीची आहे. ५३० कोटीचा वार्षिक व्यवसाय तर १ कोटी ४० लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. गडहिंग्लजमध्ये संस्थेची स्व:मालकीची प्रधान कार्यालय इमारत असून ९ पैकी गडहिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर कुडाळ या शाखा स्व:मालकीच्या इमारतीत आहेत. गेल्यावर्षी ठेवी संकलन व कर्ज वितरणात बेळगाव शाखेने आघाडी मारली आहे.संस्थेची वेबसाईट असून त्यावर वार्षिक अहवालासह ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते. सध्या एसएमएस बँकींग, सीबीएस, मायक्रो एटीएम, डेबीट कार्ड व नॅशनल अॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा उपलब्ध आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी उपाध्यक्ष वासुदेव मायदेव, सीईओ दत्तात्रय मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, सर्व संचालक, शाखाध्यक्ष, सल्लागार, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असेही चौगुले यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांना दोन वेतन वाढीकोरोनामुळे संस्था आर्थिक अडचणीत येवू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षात २० टक्के महागाई भत्ता आणि वेतनवाढ स्वेच्छेने नाकारला होता. परंतु, त्यांच्याच कष्टामुळे संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राहिल्यामुळे यावर्षी त्यांना दोन वेतनवाढी आणि २० टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे चौगुले यांनी सांगितले.