लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावरून माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांना गुरुवारी हटविण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवीन शहरप्रमुख म्हणून संजय ऊर्फ जयवंत अशोकराव हारुगले यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना पक्षातील अलिखित नियम असा आहे की, एखाद्या पदावरून संबंधित पदाधिकाऱ्यास हटविले गेले असल्यास तसे जाहीर न करता त्या जागी नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे जाहीर केले जाते. गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ‘सामना’ कार्यालयास पत्रकाद्वारे हारुगले यांची नियुक्त करण्यात आल्याचे कळविण्यात आले.
इंगवले यांना शहरप्रमुख पदावरून शिवसेना पक्षप्रमुखांनी हटविल्याची बातमी गुरुवारी दुपारपासून समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाली. विधानसभा निवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाल्यापासून इंगवले यांच्याविषयी पक्षात नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सातत्याने त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व डी.वाय. पाटील समूहावर टीका करण्याचा सपाटा लावला होता. त्यांनी ब्रह्मपुरी टेकडीवर केलेले आंदोलनदेखील चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांना शहरप्रमुख पदावरून पायउतार होण्याचे संकेत मिळाले होते.
जयवंत हारुगले कट्टर शिवसैनिक
शिवसेना शहरप्रमुखपदी निवड झालेले हारुगले कट्टर शिवसैनिक असून, गेली तीस वर्षे पक्षाच्या कार्यात त्यांनी झोकून दिले आहे. यापूर्वी त्यांनी शाखाप्रमुख, शहर उपप्रमुख म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजेश क्षीरसागर यांचे ते समर्थक आहेत. पक्ष नेतृत्वावर निष्ठा ठेवून केलेल्या कामाचे त्यांना फळ मिळाले.
फोटो क्रमांक - १५०७२०२१-कोल-जयवंत हारुगले
सूचना - या बातमीत रविकिरण इंगवले यांचाही फोटो छापावा.