चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रवीकिरण पेपर मिलमधील कामगारांनी सुरू केलेल्या नियमबाह्य आंदोलनामुळे कंपनीसह या औद्योगिक वसाहतीमधील सुरू असलेल्या उद्योगांना हानी पोहोचेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यास प्रतिबंध करून उपाययोजना करावी, असे निवेदन कंपनीत कार्यरत असणाऱ्या कामगारांनी आमदार राजेश पाटील व तहसीलदार विनोद रणवरे यांना दिले आहे.
निवेदनात, रवीकिरण पेपर मिल्समधील कर्मचारी असून कर्मचाऱ्यांना दर महिना पगार न चुकता वेळच्यावेळी बँक खात्यात जमा होतो. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रॉव्हिडंड फंड, ईएसआय व पगारी रजा (नियमांनुसार) मिळतात.
कंपनीमधील वातावरण हे गुण्या-गोविंदाचे असल्याने येथे कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला जात नाही. कंपनीत जो काही संप केला जात आहे त्यात आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, आम्हाला वेळच्यावेळी सर्व सुविधा देतात. त्यामुळे आमच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. कंपनीत काम करणारे आम्ही चंदगड तालुक्यातील रहिवाशी आहोत म्हणून आपले निदर्शनास सध्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसी परिसरातील एका उद्योगाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या काही कालावधीपासूनचे आंदोलन व विविध धरणे, निवेदने प्रचार इत्यादी प्रकार पाहत आलो आहोत.
कामगारांनी केवळ महागाई भत्ता कंपनीकडून दिला जात नाही या एका मागणीसाठी ८ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनात विविध सामाजिक राजकीय प्रतिनिधींनी सहभाग घेऊन कंपनीचे नावे मुख्य मागणीच्या अनुषंगाने संपास सुरुवात झाली आहे, असे आढळून आले आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
--------------------------
* फोटो ओळी : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रवीकिरण पेपर मिल्सच्या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना अन्य कामगार.
क्रमांक : २३०२२०२१-गड-०५