कोल्हापूर : शिवसेनेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर सक्षम व्यक्ती हवा, असे सांगत संजय पवार यांचे नाव न घेता जिल्हा प्रमुख बदलण्याची मागणी आपण यापूर्वीच पक्षप्रमुखांकडे केली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कोल्हापूर उत्तरचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांची या पदावरून उचलबांगडी करत, या पदावर माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांची निवड केल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘आगामी निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार आणि १० आमदार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना उत्तर शहरप्रमुख पदावर इंगवले यांची नियुक्ती पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे, यांच्या पत्नी नगरसेविका तेजस्वीनी इंगवले याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.’कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदावरही सक्षम व्यक्ती हवा, जिल्हाप्रमुख बदलावा, अशी मागणी आपण यापूर्वी अनेकवेळा पक्षप्रमुखांकडे केली. त्याबाबतचा निर्णयही वरिष्ठ पातळीवरून होईल. सर्वच पक्षात घरात अंतर्गत मतभेद असतातच. कोल्हापुरात ‘काही’ पदाधिकाऱ्यांना घेऊन मी दौरे केले, तर ५० मते जादा मिळतील; पण त्यापेक्षा ५०० जण दुरावतील हे लक्षात आहे; पण पक्ष म्हणून आम्ही सर्वजण एकाच झेंड्याखाली येतो, देवणे लोकसभेचे उमेदवार असताना मलाही ‘आॅफर’ होत्या, पण त्या अमिषाला बळी पडलो नाही, याचेही सर्वांनी भान ठेवावे.