सदाशिव मोरेआजरा : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. कोरोनामुळे कारखान्याची निवडणूक दोन वर्षे पुढे ढकलली आहे. कच्च्या मतदार यादीवर ११ मे पर्यंत हरकती दाखल तर त्यावर २२ मे पर्यंत निर्णय दिला जाणार आहे. कारखान्याची गटनिहाय निवडणूक होणार असून २१ संचालक निवडले जाणार आहेत. तालुका संघापाठोपाठ साखर कारखान्याची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.आज प्रसिद्ध झालेल्या कच्च्या मतदार यादीनुसार कारखान्याचे २५ हजार १८१ अ वर्ग व्यक्ती सभासद, १६५ पैकी ठराव प्राप्त १२० संस्था सभासद तर ७४३८ ब वर्ग सभासद आहेत. संचालक मंडळाची मे २०२१ मध्ये मुदत संपली तरी कोरोनामुळे दोन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. सन २०२३ ते २८ या पंचवार्षिकसाठी गटनिहाय निवडणूक होणार आहे. पाच गटातून - १५, महिला - २, इतर मागास - १, अनुसूचित जाती - १, भटक्या विमुक्त जाती - १ व ब वर्ग - १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. हरकती स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अंतिम मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निवडणूक विभागाचे नियोजन आहे.पण जुलैमध्ये प्रचंड पाऊस असल्याने या कालावधीत निवडणूक होणार की पुढे ढकलणार याबाबत संदिग्धता आहे. तालुक्यातील जनता बँक, स्वामी विवेकानंद पतसंस्था यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र तालुका संघात बिनविरोधाला ब्रेक लागणार असून संघाबरोबर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची व रंगतदार होणार आहे.
आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध, तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 11:58 AM