कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील सदरबझार परिसरातील राजर्षी शाहू कॉलेजच्या क्रीडांगणाच्या निम्म्या जागेवर संस्थेतर्फे सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी नुकतीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, सरोज पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. बी. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या शाळेची उभारणी करून रयत संस्था आता सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणामध्येही पाऊल ठेवत आहे.
या शाळेसाठी रयत संस्था व प्रा. पाटील यांच्यामुळेच आपले जीवन घडले या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून डॉ. एम. बी. शेख यांनी संस्थेला तब्बल ६० लाख रुपयांची देणगी दिली आहे. प्रा. पाटील यांनीच शाहू कॉलेजसाठी ही साडेनऊ एकर जागा १९७५ च्या दरम्यान खरेदी केली आहे. सध्या यातील दोन एकर जागेवर महाविद्यालयाची इमारत उभी आहे. मागील बाजूस जलतरण तलाव, मुलींच्या वसतिगृहासाठी दोन एकर जागा वापरली आहे. त्यामुळे साडेपाच ते सहा एकर जागा सध्या शिल्लक आहे. त्या जागेवर क्रीडांगण असून ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक आहे. सीबीएसई पॅटर्नच्या शाळेच्या निकषानुसार सांगलीचे प्रसिध्द आर्किटेक्ट तायवाडे पाटील यांनी आराखडा केला; परंतु हा पूर्ण ट्रॅक ठेवून उर्वरित जागेत शाळेची इमारत होऊ शकत नाही. त्यामुळे संस्थेने ४०० मीटरचा ट्रॅक कमी करून २०० मीटरचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना व्यायामासाठी, खेळण्यासाठी क्रीडांगणही उपलब्ध होईल व उत्तम दर्जाची शाळाही उभी राहील. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी.साळुंखे यांनी स्वागत केले. संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते, विक्रांत पाटील, सत्यजित कदम, प्रशांत पाटील, बांधकाम समिती प्रमुख डॉ. आर.एस.डुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी असेल शाळा..
पहिली ते दहावीपर्यंत प्रत्येकी तीन तुकड्या असणारी शाळा..
विद्यार्थ्यांची संख्या : १२००
पाच वर्षांत शाळा पूर्ण विकसित करण्याचे नियोजन
कमी शुल्कात सामान्य कुुटुंबातील मुलांना उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार
मदत झाली अशी..
रयत शिक्षण संस्थेच्याच कऱ्हाड कॉलेजकडून १ कोटी रुपये
डॉ. एम. बी. शेख : ६० लाख रुपये
सरोज आयर्नकडून : ५ लाख रुपये
कौशल्य विकास केंद्राची उभारणी...
शाळेला जोडून याच इमारतीत एन. डी. पाटील कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये बँकिंग व फौंड्री उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फौंड्री उद्योगाशी सामंजस्य करार करून या केंद्रातील प्रशिक्षित मनुष्यबळास तातडीने नोकरी देण्यात येणार आहे. याचा फायदा त्याच परिसरातील अनेक तरुणांना होऊ शकतो. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, सरोज आर्यनचे दीपक जाधव यांचे त्यासाठी सहकार्य लाभत आहे.
फोटो : २३०२२०२१-कोल-शाहू कॉलेज
रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हापुरातील सदरबझार परिसरातील राजर्षी शाहू कॉलेजच्या क्रीडांगणाच्या निम्म्या जागेवर संस्थेतर्फे सीबीएसई पॅटर्नची शाळा होत आहे. त्याची पायाभरणी नुकतीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, सरोज पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. बी. शेख आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.