भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर शासनाचे दरपत्रक (आरसी) सोयीस्करपणे गुंडाळून ठेवत स्व-निधीतून सायकल, शिलाई मशीन, भांडी संच, मिरची कांडप संच असे तब्बल ३ कोटी ८९ लाख २३ हजार रुपयांच्या साहित्य खरेदीचा घाट जिल्हा परिषदेतील ‘कारभाऱ्यांनी’ घातला आहे. ‘आरसी’ला बगल दिल्यामुळे ‘ढपल्या’चा संशय बळावला आहे. बाजारपेठेतील नामांकीत कंपन्यांऐवजी ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ झालेल्यांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. नामांकित कंपन्यांपेक्षा या कंपन्यांचे दरही जास्त आहेत. आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यास निवडलेल्या तीनपैकी कमी किंमत असलेल्या कंपनीचे साहित्य खरेदी होईल. समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलांना सायकल देण्यासाठी २० टक्के जिल्हा परिषद स्वनिधीतून ८० लाखांची तरतूद आहे. त्यासाठी प्रणोती एंटरप्रायजेस (सायकल किंमत - ५ हजार ६००), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स ( ५ हजार ६४०), अर्णव सप्लायर्स (५ हजार ६८०) या कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविण्यासाठी ८५ लाख २३ हजारांची तरतूद आहे. निविदेनुसार सुनील ट्रेडर्स (सायकल किंमत- ३ हजार ७९५), प्रणोती एंटरप्रायजेस (५ हजार ६७०), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (६ हजार १००), अर्णव सप्लायर्स (६ हजार १३०) कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय व्यक्ती व महिलांना शिलाई मशीन पुरवण्यासाठी ८० लाखांची तरतूद आहे. अणर्व सप्लायर्स (मशीन किंमत - ६ हजार ३००), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (६ हजार ३६०), परिक्षीत अॅग्रो टेक्निक्स (६ हजार ४१०) या शिलाई मशीनच्या कंपन्यांची निवड केली आहे. वीस टक्के स्वनिधीतून मागासवर्गीय वस्तीमधील समाजमंदिर, महिला बचतगटांना भांडी संच पुरवण्यासाठी ५५ लाखांची तरतूद केली आहे. यासाठी एव्हरेस्ट इंडस्ट्रीज (भांडी संच किंमत २७,५२२), ए. एस. ट्रेडिंग कंपनी (२९, ९९०), अर्णव सप्लायर्स (३०, १००), प्रणोती एंटरप्रायजेस (३०, १३०) या कंपन्यांची अनुक्रमे निवड झाली आहे. तीन टक्के अपंग निधीमधून मागासवर्गीय व्यक्ती, महिला, अपंग व्यक्तींना मिरची कांडप मशीन देण्यासाठी ८९ लाखांची तरतूद केली आहे. यासाठी श्री व्यंकटेश एंटरप्रायजेस (मिरची कांडप यंत्र -३३, ३००), परिक्षित अॅग्रो टेक्निक्स (३९९००), अर्णव सप्लायर्स (३९९७०), पार्श्व एनर्जी सोल्युशन्स (४०,०००) या कंपन्यांची निवड केली आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे या कंपन्यांची निवड केली आहे. ‘स्थायी’ची मान्यता; कारभाऱ्यांच्या हेतूवर संशययंदा स्थायी समितीमध्ये वैयक्तिक लाभासाठी साहित्य खरेदीचा विषय ठेवण्यात आला. गेल्यावेळी ज्यांनी आरसीचा आग्रह केला होता त्यांनी ‘सोयीची भूमिका’ घेत खुल्या पद्धतीने निविदा काढून साहित्य खरेदीला मान्यता दिली. आरसी असताना निविदा काढून साहित्य खरेदी नियमबाह्य आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘आरसी’नुसारच खरेदी करावी, असे सूचित केले आहे; पण बहुतांशी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी ‘आरसी’ नको, अशी भूमिका घेतली आहे. खुल्या निविदेने खरेदी करतानाही नामांकित कंपन्यांचे साहित्य घेण्याची संधी होती, पण तसे न करता ‘ढपल्या’ला हिरवा कंदील दिलेल्या कंपनीचे साहित्य घेण्याचा घाट आहे. ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्यातील बहुतांशी कंपन्यांचे साहित्याचे दर कंपनीपेक्षा अधिक आहेत म्हणूनच ‘कारभाऱ्यां’च्या हेतूवर संशय ठळक होत आहे म्हणून हा विषय सभेत वादळी ठरणार आहे.
‘आरसी’ गुंडाळून चार कोटींचे साहित्य खरेदीचा ‘डाव’
By admin | Published: January 19, 2016 12:47 AM