कोल्हापूर : आंदोलकांच्या धास्तीने जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे महापालिका प्रशासनाने पुन्हा गुरुवारी जुजबी प्रयत्न केले. बंधाऱ्यावर खर-मातीची पोती भरून रचून नदीत जाणारे पाणी अडविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पंधरा दिवसांपूर्वी असाच घातलेला तात्पुरता बांध हलक्या पावसाने वाहून गेला होता. जुजबी प्रयत्न करण्यापेक्षा बंधाऱ्याची उंची कायमची वाढविण्याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.जयंती नाल्यातून मैला थेट नदीत सोडण्याचा प्रकार बुधवारी (दि. ३) उघड झाला होता. यानंतर आंदोलकांनी महापालिका प्रशासनास धारेवर धरले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही महापालिका प्रशासनाला नोटीस बजावून ठोस उपाय योजण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार महापालिकेने नाल्यावरील बंधाऱ्यावर पोती रचून ठेवून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने दोन महिन्यांत अनेक वेळा जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत गेले. शहरात पडलेल्या हलक्याशा पावसानेही नाला नदीत मिसळत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हरफ्लो’ होऊन सांडपाणी प्रक्रियेविना नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याची सद्य:स्थिती आहे. हलक्या पावसाचे मिसळणारे पाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तात्पुरती यंत्रणा उभारली आहे. मात्र, जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. कसबा बावड्यातील सांडपाणी केंद्रातून सध्या जयंती नाल्यातून उपसा होणाऱ्या ५० ते ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यानेच नाला ओसंडून वाहत आहे. वीस वर्षांपूर्वीची लोकसंख्या व सांडपाणी अडवून धरण्याची क्षमता असलेल्या नाल्याची उंची कायमची वाढविण्याची मागणी होऊनही निव्वळ काही बांधकाम व्यावसायिकांचे हित सांभाळण्यासाठीच प्रशासन बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा निर्णय प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे. आठवड्यासाठी जुजबी उपाययोजनाआता बंधाऱ्याची उंची तात्पुरती वाढविल्याने हलक्या पावसाने किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रकार बंद होईल. पावसाळा सुरू झाल्यानंतर १० जूनच्या दरम्यान बंधाऱ्याचे बरगे काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत येत्या आठ दिवसांसाठी जुजबी उपाययोजना करून नदीप्रदूषण रोखण्याचे प्रयत्न करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
जयंती नाल्यावर पुन्हा बांध
By admin | Published: June 05, 2015 12:26 AM